मालिका लिहिणं सोप्प नसतं..., ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या लेखिकेनं ट्रोलर्सला सुनावलं...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 12:57 PM2022-03-11T12:57:40+5:302022-03-11T13:00:47+5:30
Aai Kuthe Kay Karte : अरूंधती, संजना, अनिरूद्ध यांच्या भोवती विणलेल्या या कथेने प्रेक्षकांना डोक्यावर घेतलं. अर्थात मालिकेतील वेगवेगळे ट्विस्ट न आवडल्यानं काहींनी मालिकेला ट्रोलही केलं.
‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरची सध्या गाजत असलेली मालिका. अरूंधती, संजना, अनिरूद्ध यांच्या भोवती विणलेल्या या कथेने प्रेक्षकांना डोक्यावर घेतलं. अर्थात काहींनी मालिकेतील वेगवेगळे ट्विस्ट न आवडल्यानं मालिकेला ट्रोलही केलं.
गेल्या काही दिवसांपासून या मालिकेला सतत ट्रोल केलं जात आहे. मालिकेतील काही दृश्य, संवादावरून सोशल मीडिया युजर्स संताप व्यक्त करत आहेत. अनेकांनी तर मालिकेच्या लेखिका मुग्धा गोडबोले (Mugdha Godbole) यांनाही ट्रोल केलं आहे. ‘पहाटे पहाटे दारू पिऊन मालिका लिहिता का?’, असा सवाल युजर्सनी त्यांना उद्देशून केला आहे. आता मुग्धा यांनी या ट्रोलर्सला खरपूस भाषेत उत्तर दिलं आहे. ‘टीव्ही 9’ला दिलेल्या मुलाखतीत मुग्धा बोलल्या.
काय म्हणाल्या मुग्धा...
अलीकडे ट्रोलिंग हा प्रकार खूप वाढला आहे. आपल्याकडे मालिका आवडली की, त्यातल्या कलाकारांमुळे ती लोकप्रिय होते आणि आवडली नाही म्हणजे मालिकेच्या लेखकांना दोष दिला जातो. अशावेळी खूप वाईट वाटतं. अशावेळी एका मालिकेमागे किती कष्ट असतात, ही यंत्रणा कशी असते, हे जरा समजून घ्या असं सांगावसं वाटतं. माझ्या डोक्यात येतं अन् मी लिहिते असं होत नाही. त्यामागे 15-16 जणांची टीम असते.
ही टीम डोळ्यांत तेल घालून स्क्रिप्ट वाचते. पुढे काय करायचं हे ही टीम ठरवते. लेखकाच्या हातात काहीही नसतं. लेखक गांजा मारून लिहितात का? अशी टीका होते तेव्हा मला खरंच सांगावसं वाटतं की, असं नसतं. लोकांना मालिका आवडावी इतकीच आमचीही अपेक्षा असते. लेखकांबद्दल वाट्टेल ते लोक बोलतात, त्यांचे संस्कार काढतात, तेव्हा मला खरंच असं विचारावंसं वाटतं की, ज्या भाषेत तुम्ही शिव्या घालता, त्या कुठल्या संस्काराचं लक्षण आहे.
मालिका लिहणं सोपं काम नाही. रोज अर्ध्या तासाचा एपिसोड प्रेक्षकांना द्यायचं म्हटल्यावर काय आणायचं याचा प्रश्न आम्हालाही नेहमीच पडतो. एक एपिसोड लिहायला 5 ते 6 तास लागतात, असंही त्या म्हणाल्या.