'लाल सिंह चड्ढा' फ्लॉप झाल्यानंतर आमिर खानला मिळाली राजकुमार हिरानीची साथ, बायोपिकमध्ये करणार एकत्र काम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 01:08 PM2023-07-05T13:08:29+5:302023-07-05T13:11:44+5:30
'लाल सिंह चड्ढा' चित्रपट फ्लॉप झाल्यापासून बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान चित्रपट जगतापासून दूर आहे.
'लाल सिंह चड्ढा' चित्रपट फ्लॉप झाल्यापासून बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान चित्रपट जगतापासून दूर आहे. आमिर खानचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. त्यानंतर आमिर खानने फिल्मी दुनियेतून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आमिर खानने मोठ्या पडद्यावर पुनरागमन करावे आणि पुन्हा एकदा धमाल करावी, असे आमिर खानच्या चाहत्यांना वाटते. यानंतर आमिर खानच्या '3 इडियट्स' चित्रपटाच्या दुसऱ्या भागाशी संबंधित काही बातम्या समोर आल्या. यानंतर आता एका बायोपिकशी आमिर खानचं नाव जोडले जात आहे. जाणून घेऊया काय आहे हे संपूर्ण प्रकरण.
आमिर खानने चित्रपट जगतातून ब्रेक घेतला तेव्हापासून त्याचे चाहते त्याच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. आमिर खानने 'लाल सिंह चढ्ढा' नंतर कोणत्याही चित्रपटात काम केलेले नाही. आता आमिर खानचे नाव एका बायोपिकशी जोडले जात आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, आमिर खान आणि राजकुमार हिरानी या चित्रपटात पुन्हा एकत्र काम करणार आहेत. हा एक बायोपिक असणार आहे. आमिर खानने या प्रोजेक्टमध्ये इंटरेस्ट दाखवल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे. या बायोपिकचे शूटिंग पुढील वर्षी म्हणजेच 2024 पासून सुरू होणार आहे.राजकुमार हिरानी सध्या शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.
आमिर खान आणि राजकुमार हिरानी यांची जोडी बॉक्स ऑफिसवर हिट ठरली आहे. आमिर खान आणि राजकुमार हिरानी यांनी पहिल्यांदा 2009 मध्ये '3 इडियट्स'मध्ये एकत्र काम केले होते. त्यानंतर दोघांची जोडी 'पीके' चित्रपटात एकत्र दिसली होती. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करण्यात यशस्वी ठरले.