"आपण सिनेमात महिलांना आयटम बनवतो", आमिर खानने व्यक्त केली खंत; म्हणाला- मला लाज वाटते...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 09:32 AM2024-02-05T09:32:48+5:302024-02-05T09:36:56+5:30
किरण रावने 'ॲनिमल'वर टीका केल्यानंतर संदीप रेड्डींनी तिला सुनावलं होतं. एक्स पती आमिर खानचे चित्रपट त्यांनी पाहिले पाहिजेत, असं ते म्हणाले होते. त्यानंतर आता यावर आमिर खानने भाष्य केलं आहे.
रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या 'ॲनिमल' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. पण, काही सीन्समुळे या सिनेमाला ट्रोलही करण्यात आलं होतं. या सिनेमात पुरुषांचं महिलांबरोबर दाखवण्यात आलेलं वर्तन यामुळे किरण रावनेही या सिनेमावर टीका केली होती. त्यानंतर 'ॲनिमल'चे दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी यांनी किरण रावला सुनावलं होतं. एक्स पती आमिर खानचे चित्रपट त्यांनी पाहिले पाहिजेत, असं ते म्हणाले होते. त्यानंतर आता यावर आमिर खानने भाष्य केलं आहे.
संदीप वांगा रेड्डी यांनी आमिर खानच्या दिल सिनेमातील एका सीनचा उल्लेख केला होता. ज्यामध्ये आमिर खान माधुरीला मारत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर त्या दोघांमध्ये प्रेम झाल्याचंही दाखवलं गेलं होतं. दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत संदीप वांगा म्हणाले होते, "मी त्या महिलेला सांगू इच्छितो की आधी आमिर खानला जाऊन...खंबे जैसी खडी है या गाण्याबद्दल विचार." आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिरने याबाबत मौन सोडत माफीही मागितली आहे.
आमिरने आजतकला दिलेल्या मुलाखतीत याबाबत भाष्य केलं आहे. तो म्हणाला, "हिंदी चित्रपट तेवढ्या जबाबदारीने बनवले जात नाहीत. ज्याप्रमाणे सिनेमात महिला आणि पुरुषांना दाखवलं जातं. जेव्हा आपण सिनेमात काहीतरी चुकीचं दाखवतो तेव्हा त्याचे परिणाम चांगले झाले आहेत, असंही दाखवलं जातं. जे चुकीचं आहे. आपण सिनेमात महिलांना आयटम बनवतो. तू चीज बडी है मस्त मस्त... अशा गाण्यांमध्येही आपण तेच करतो. या सगळ्यात माझाही कुठेतरी हातभार आहे. मी पण असे सिनेमे केले आहेत. खंबे जैसी खडी है, लड़की है या छड़ी है...या गाण्यात आपण महिलांना माणूस म्हणत नाही. मला याची लाज वाटते."