Laal Singh Chaddha: 'काही लोकांना वाटतं की माझं देशावर प्रेम नाही, पण...', ट्रोलिंगवर आमिर खान पहिल्यांदाच बोलला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 01:11 PM2022-08-01T13:11:04+5:302022-08-01T13:12:12+5:30
Laal Singh Chaddha: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बॉयकॉट लाल सिंह चड्ढा ट्रेंड करत आहे.
Laal Singh Chaddha:आमिर खानचा ड्रीम प्रोजेक्ट लालसिंग सिंग चड्ढा या महिन्यात प्रदर्शित होतोय. पण, प्रदर्शनापूर्वी चित्रपटाविरोधात बायकॉट मोहिम राबवली जात आहे. सोशल मीडियावर अनेकजण या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत. तसेच, #BoycottLaalSinghCaddha हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करतोय. चित्रपटाबाबत निर्माण होत असलेल्या नकारात्मक वातावरणावर अखेर आमिर खानने मौन सोडले आहे.
काय म्हणाला आमिर खान?
आमिर खानचा ठग्स ऑफ हिंदुस्तान चित्रपट मोठा फ्लॉप झाला होता. त्यामुळे आमिरला लाल सिंह चड्ढापासून खूप अपेक्षा आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून बॉयकॉट लाल सिंह चड्ढा सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. या बहिष्कारामुळे आमिर नाराज आहे. यावर आपले मत मांडताना आमिर म्हणाला की, 'चित्रपट बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. केवळ अभिनेताच नाही तर अनेक लोकांच्या भावना चित्रपटाशी जोडल्या जातात. चित्रपट पाहिल्यानंतर, तुम्हाला तो आवडू शकतो आणि तुम्हाला तो नापसंत करण्याचा पूर्ण अधिकार आहे.'
'माझे देशावर प्रेम नाही...'
'पण, चित्रपट रिलीज होण्यापूर्वी अशा गोष्टी दुखावतात. लोक असे का करतात हे माहित नाही. माझे भारत देशावर प्रेम नाही, असे काही लोकांना वाटते हे माहित आहे. पण मला त्या लोकांना सांगायचे आहे की, ते चुकीचा विचार करत आहेत. मला माझा देश आणि देशातील लोकांवर प्रचंड प्रेम आहे. मी त्यांना विनंती करेन की कृपया माझ्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नका आणि थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पहा.'
अक्षय-आमिरची टक्कर
राखी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच 11 ऑगस्टला आमिर खानचा लाल सिंह चड्ढा आणि अक्षय कुमारचारक्षाबंधन प्रदर्शित होतोय. त्यामुळे अक्षय आणि आमिरमध्ये कोण बाजी मारतो, हे पाहणे महत्वाचे ठरेल. याबाबत बोलताना आमिर म्हणाला की, 'मला रक्षाबंधनाचा ट्रेलर आवडला, मी दिग्दर्शकाला फोन करुन शुभेच्छाही दिल्या. दोन्ही कौटुंबिक चित्रपट आहेत. प्रेक्षकांनी दोन्ही चित्रपटांवर प्रेम करावे अशी माझी इच्छा आहे.'