'मेला' सिनेमात आमिर खानला करायचा होता अश्लील सीन, इतक्या वर्षांनंतर दिग्दर्शकाचा मोठा दावा, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 12:58 PM2023-10-25T12:58:02+5:302023-10-25T12:58:53+5:30
'मेला' हा चित्रपट मात्र आमिरच्या बॉलिवूड करिअरमधील अत्यंत वाईट चित्रपट मानला जातो. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरही फ्लॉप ठरला होता. आता २३ वर्षांनंतर 'मेला' सिनेमाचे दिग्दर्शक धर्मेश दर्शन यांनी आमिर खानबद्दल एका मुलाखतीत धक्कादायक खुलासे केले आहेत.
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख मिळवलेल्या आमिर खानने अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले. पण, २००० साली प्रदर्शित झालेला 'मेला' हा चित्रपट मात्र आमिरच्या बॉलिवूड करिअरमधील अत्यंत वाईट चित्रपट मानला जातो. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरही फ्लॉप ठरला होता. या चित्रपटात आमिर खान, फैजल खान आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना मुख्य भूमिकेत होते. आता २३ वर्षांनंतर 'मेला' सिनेमाचे दिग्दर्शक धर्मेश दर्शन यांनी आमिर खानबद्दल एका मुलाखतीत धक्कादायक खुलासे केले आहेत.
'मेला'मधून आमिरचा भाऊ फैजल खानने पुनरागमन केलं होतं. याबाबत दिग्दर्शक धर्मेंद्र म्हणाले, "मेला चित्रपटाबाबतीत आमिर खान गंभीर नव्हता. त्याला फक्त भावाचं करिअर रुळावर आणण्यासाठी हा चित्रपट करायचा होता. त्याने मेलाच्या क्वालिटीवरही लक्ष दिलं नव्हतं." आमिर खानला मेला चित्रपटात अश्लील सीन करायचा होता, असा धक्कादायक खुलासाही धर्मेंद्र यांनी या मुलाखतीत केला.
"मेला सिनेमात आमिरला त्याच्या प्रतिमेच्या अगदी विरुद्ध असलेले सीन्स करायचे होते. त्याला या सिनेमात एक अश्लील सीनही करायचा होता. हा सीन शूट करण्यासाठी आमिरने माझ्याकडे हट्टही धरला होता. हा अश्लील सीन आमिरने डंब अँड डंबर या हॉलिवूड सिनेमात पाहिला होता. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण, आमिरचा या चित्रपटात जॉनी लिव्हरबरोबर लघुशंकेचा एक सीन आहे. हा सीन ऐकल्यानंतर मी अक्षरश: रडलो होतो. आमिरच्या चित्रपटात असा सीन आहे, यावर माझा विश्वासच बसत नव्हता," असंही ते पुढे म्हणाले.
'मेला' चित्रपट ट्विंकल खन्नाच्या आधी काजोलकडे आला होता. पण, काजोलने या चित्रपटाला स्पष्ट नकार दिला होता. धर्मेंद्र यांनी याबाबतही खुलासा केला. ते म्हणाले, "काजोलने आमिर खानमुळे मेला चित्रपटाला नकार दिला. तेव्हा आमिर एका सीनसाठी अनेक रिटेक घेत असल्याची चर्चा होती. आणि काजोल एकाच टेकमध्ये तिचे सीन्स करत होती. पण, आमिर खानबरोबर काम करण्यासाठी तेव्हा काजोल तयार नव्हती. म्हणून तिने चित्रपटाला नकार दिला."