‘अब्बा त्यांच्या बाजूला बसू देतात, हा त्यांचा मोठेपणा’

By Admin | Published: March 3, 2017 02:51 AM2017-03-03T02:51:16+5:302017-03-03T02:51:16+5:30

‘रबाब’ या अफगाणी तंतूवाद्याचे नाव भारतीय शास्त्रीय संगीतवेड्यांसाठी नवे नाही.

'Abba sits beside them, this is their greatness' | ‘अब्बा त्यांच्या बाजूला बसू देतात, हा त्यांचा मोठेपणा’

‘अब्बा त्यांच्या बाजूला बसू देतात, हा त्यांचा मोठेपणा’

googlenewsNext

रुपाली मुधोळकर
‘रबाब’ या अफगाणी तंतूवाद्याचे नाव भारतीय शास्त्रीय संगीतवेड्यांसाठी नवे नाही. पण आजच्या नव्या पिढीने कदाचितच या तंतूवाद्याचे नाव ऐकले असावे. ग्लाल्हेरच्या ‘सेनिया बंगश’ या घराण्याच्या संगीततज्ज्ञांनी ‘रबाब’मध्ये काही बदल करीत ‘सरोद’ या नव्या तंतूवाद्याला जन्म दिला. या घराण्याची देण असलेल्या सरोदच्या मंजूळ झंकाराने भारतीय संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध केले. विख्यात सरोद वादक उस्ताद अमजद अली खान हे या घराण्याच्या सहाव्या पिढीचे वारस. याच घराण्याची सातवी पिढी अर्थात अमान अली बंगश आणि अयान अली बंगश यांनी सतारवादनाचा हा वारसा पुढे चालविला आहे. अमान व अयान बंधू लवकरच ‘रबाब टू सरोद’ हा आगळावेगळा अल्बम घेऊन येत आहेत. त्यानिमित्त या दोन बंधूंशी क्रमाक्रमाने मारलेल्या गप्पांचा हा वृत्तांत....
प्रश्न : ‘रबाब टू सरोद’ या अल्बमबद्दल काय सांगाल?
अमान : रबाब हे अनेक वर्षांची परंपरा लाभलेले एक लोकवाद्य आहे. बॉलिवूडमधील अनेक गाण्यात रबाबचा वापर झालेला आहे. याच प्राचीन तंतूवाद्याचे सुधारित रूप म्हणजे सरोद.लोकसंगीतापासून भारतीय शास्त्रीय संगीतापर्यंत रबाब ते सरोदचा प्रवास आम्ही या अल्बममध्ये दाखवणार आहोत. काही जुनी गाणी, शास्त्रीय राग संगीतप्रेमींना यात ऐकायला मिळणार आहेत.

प्रश्न : ‘रबाब’चे नाव दर्दी संगीतप्रेमींसाठी नवे नाही. पण नव्या पिढीसाठी हे नाव नवे आहे. अशास्थितीत ‘रबाब टू सरोद’ अल्बम आणण्याचा निर्णय व्यावसायिकदृष्ट्या किती धाडसी वाटतो?
अमान : शिख धर्मगुरु गुरुनानक यांचे बंधू मरदानाजी हे एक निष्णांत रबाबवादक होते. बॉलिवूडच्या ‘शोले’ चित्रपटातील ‘मेहबूबा मेहबूबा’ या व अशा अनेक गाण्यात रबाबचा वापर झालाय. रबाब लोकांना माहित नाही असे नाही. पण होय, नव्या पिढीला या वाद्याची फारसी ओळख नाही, हेही खरे आहे. मात्र आमचा उद्देश पूर्णपणे व्यावसायिक नाही. आमच्यावर उदंड प्रेम करणाऱ्या चाहत्याच्या प्रेमाची परतफेड म्हणून मी व अयान भाईने हा अल्बम आणला आहे. विशेष म्हणजे हा अल्बम एका विशिष्ट क्लाससाठी नाही तर सगळ्यांसाठी आहे.

प्रश्न: शास्त्रीय संगाताचे जाणकार, शास्त्रीय संगीताचे दर्दी अलीकडे कमी झालेत, असे तुम्हाला वाटते?
अमान : नाही, असे म्हणता येणार नाही. पुणे, मुंबईसारख्या शहरात हजारोंची गर्दी सतार ऐकायला येते आणि पहाटेपर्यंत ऐकत राहते, यावरून तरी मला स्वत:ला असे वाटत नाही. माझ्या मते, प्रत्येक भारतीय श्रोत्याच्या मनावर शास्त्रीय संगीतापेक्षा त्यांच्या आवडीचा कलाकार राज्य करतो. प्रत्येकाची विशिष्ट अभिरूची आहे. आपल्या आवडत्या अभिरूचीच्या गायकाला, वादकाला ऐकायला भारतीय श्रोता अगदी मनापासून जातो.

पुढचा संवाद अयान अली बंगश यांच्याशी...

प्रश्न: अयान आणि अमान ही आता एक जोडी बनली आहे. पण तुम्ही एकमेकांचे स्पर्धकही आहात?
अयान : अमान भाई आणि माझ्या वयात केवळ दोन वर्षांचा फरक आहे. त्यामुळे भावाच्या नात्यापेक्षा आमच्यात मैत्री अधिक आहे. अर्थात सर्वोत्तम देण्याच्या प्रयत्नांत कधी कधी आमच्यातही रचनात्मक मतभेद होतात. पण यामागचा उद्देश सरतेशेवटी सर्वोत्तम कलाकृती जन्मास घालणे हाच असतो. माझ्या मते, दोन कलाकारांमध्ये रचनात्मक मतभेद असणे ही अतिशय सामान्य आणि नैसर्गिक बाब आहे.

प्रश्न : अयान भाई, उस्ताद अमजद अली खान यांच्या नावाभोवती प्रसिद्धीचे खूप मोठे वलय आहेत. पिता म्हणून ते कसे आहेत?
अयान : मी आणि अमान भाई आम्ही दोघेही स्वत:ला खूप भाग्यवान समजतो की, पिताच आमचे गुरु आहेत आणि गुरूच आमचे पिता आहेत. गुरु या नात्याने म्हणाल तर आम्ही आज जे काही आहोत, ते त्यांच्यामुळेच आहोत. अब्बा या नात्याने म्हणाल तर ते आता आमचे अब्बा नाही तर मित्र झाले आहेत. आमची अम्मी अतिशय कडक शिस्तीची.अनेकदा तिच्यापासून बचाव करायचा झाला की, आम्ही अब्बाची मदत घ्यायचो. आजही घेतो. अब्बांनी आम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी रोखले नाही. पण सोबतच आमच्यावर संस्कार करण्यात ते कुठेही चुकले नाहीत. स्टेजवर वावरण्यापासून तर बैठक घालण्यापर्यंतचे बारकावे त्यांनी आमच्या अंगी रूजवले.

प्रश्न: अब्बांसोबत स्टेजवरचा अनुभव कसा असतो?
अयान : त्यांच्यासोबत मैफिलीत बसणे, खरे तर हाच एक मोठा सन्मान आहे. ते त्यांच्या बाजूला बसवतात, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे.

प्रश्न: गेल्या अनेक वर्षांत भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा किती प्रगल्भ झालीय?
अयान : भारतीय शास्त्रीय संगीत अमर आहे. शास्त्रीय संगीत ऐकणारे लोक उरले नाहीत, असे लोक म्हणतात. कारण प्रत्येकवेळी शास्त्रीय संगीताची बॉलिवूडशी तुलना केली जाते. पहाटे सहा वाजता पण समोर हजारोंच्या संख्येत बसलेले श्रोते जागचे जराही हलत नाहीत, याचे कारण शास्त्रीय संगीत अमर आहे.

प्रश्न : सध्या बॉलिवूडमध्ये नव्वदच्या दशकातील गाण्यांच्या रिमेकचा एक नवा टेंड आला आहे. याकडे कसे बघता?
अयान : व्यावसायिक नजरेतून
बघितले तर ट्रेंड पूर्णपणे कमर्शिअल असाच म्हणावा लागेल. नव्या पिढीला रिमेक आवडू लागलं म्हटल्यावर त्यांच्यापुढे तेच वाढलं जाणार. मी यावर फार काही बोलणार नाही.

Web Title: 'Abba sits beside them, this is their greatness'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.