अभिषेक बच्चन म्हणतो - 'दसवीं' चित्रपट माझ्यासाठी खूप खास, जाणून घ्या याबद्दल

By तेजल गावडे | Published: April 3, 2022 08:00 AM2022-04-03T08:00:00+5:302022-04-03T08:00:01+5:30

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आगामी चित्रपट 'दसवीं' (Dasvi Movie)मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट ७ एप्रिलला ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

Abhishek Bachchan says - 'Dasvi' movie is very special for me, find out about it | अभिषेक बच्चन म्हणतो - 'दसवीं' चित्रपट माझ्यासाठी खूप खास, जाणून घ्या याबद्दल

अभिषेक बच्चन म्हणतो - 'दसवीं' चित्रपट माझ्यासाठी खूप खास, जाणून घ्या याबद्दल

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आगामी चित्रपट 'दसवीं' (Dasvi Movie)मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट ७ एप्रिलला ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन गंगा राम चौधरीची भूमिका साकारताना दिसणार आहे. या निमित्ताने त्याच्याशी केलेली ही बातचीत...

- तेजल गावडे

'दसवीं' चित्रपटाबद्दल थोडक्यात सांग?
- 'दसवीं' हा खूपच मजेशीर, कमर्शिल आणि कौटुंबिक चित्रपट आहे. हा एण्टरटेनिंग चित्रपट आहे. यात कोणत्या समस्या किंवा मुद्द्यावर भाष्य करण्यात आलेले नाही. या चित्रपटाचा उद्देश फक्त लोकांचे मनोरंजन करणे इतकेच आहे. यासोबतच लोकांना संदेशही मिळणार आहे.

या चित्रपटात तू जाट नेत्याची भूमिका साकारली आहेस, तर या भूमिकेसाठी तू काय तयारी केलीस?
- जेव्हा माझ्याकडे 'दसवीं'ची स्क्रिप्ट आली होती, तेव्हाच हे पात्र खूप बारकाईने लिहिण्यात आले होते. त्यामुळे मला जास्त काही करावे लागले नाही. तसेही
प्रत्येक कलाकार भूमिकेची तयारी करतो आणि ती त्याने केलीदेखील पाहिजे. विशेष करून जर तुम्हाला अशी भूमिका मिळेल ज्याच्यासाठी अभ्यास आणि मेहनत घ्यावी लागतेच. 'दसवीं'मध्ये मी जाट नेत्याची भूमिका साकारली आहे. त्याच्या बोलण्याचा लहेजा, वावरण्याची पद्धत याच्या तयारीसाठी मला जवळपास दीड ते दोन महिने लागले. 

या चित्रपटात काम करण्याचा अनुभव कसा होता?
- खूपच छान अनुभव होता. आमचे जे दिग्दर्शक आहेत तुषार जलोटा यांचा हा पहिला चित्रपट आहे. पण त्यांच्यासोबत काम करायला खूप मजा आली. निमरत कौर आणि यामी गौतम यांच्यासोबत मी पहिल्यांदाच काम केले आहे. दोघीही खूप चांगल्या कलाकार आहेत. जेव्हा तुमचे सहकलाकार चांगले असतात तेव्हा तुमचे चांगले काम पडद्यावर दिसून येते. यामी आणि निमरतसोबत काम करण्याचा अनुभवही असाच होता. तसेच इतर कलाकारांसोबत काम करायलादेखील मजा आली आणि सगळ्यांकडून खूप काही शिकायला मिळाले. 

'दसवीं' चित्रपटात काम केल्यानंतर तुझ्यात काही बदल झाला आहे का? 
- मला असे वाटले की मी जास्त करून स्वतःच्या कामाबद्दल बोलण्यासाठी संकोच करतो. कारण मला विचित्र वाटते स्वतःबद्दल बोलायला आणि स्वतःचे प्रमोशन करायला. पण मला हे सांगायचे आहे की मी एक चांगला चित्रपट केला आहे, याचा मला गर्व वाटतो. हा चित्रपट खूप प्रेमाने बनवला आहे. या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली. या चित्रपटाच्या बाबतीत जेवढा मी नर्व्हस आहे तितकाच मी उत्सुकही आहे. कारण हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल, अशी मला आशा आहे. हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. एक असा चित्रपट जो एण्टरटेनिंगदेखील आहे आणि तुम्हाला विचार करण्यासाठी प्रवृत्त करतो. अशा प्रोजेक्टचा भाग बनल्याचा खूप आनंद होतो.

कधी चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात यशस्वी ठरतो तर कधी अपयशी, तर तू याकडे कोणत्या दृष्टीकोणातून पाहतोस?
- आम्हाला प्रत्येक चित्रपटाकडून खूप अपेक्षा असते. त्यासाठी आम्ही त्यात काम करतो. हे चित्रपट यशस्वी ठरणार की नाही, हे आपल्या हातात नसते. आम्हाला चांगलाच चित्रपट करायचा असतो. तो चित्रपट चांगला आहे की नाही हे प्रेक्षक ठरवतात. त्यांचे मत ग्राह्य धरले जाते. जर त्यांना कोणता चित्रपट नाही आवडला, तर आमचे मन तुटते. कारण आम्ही एवढी मेहनत घेतलेली असते त्यामुळे नाराज होतो. तेव्हा आम्ही प्रार्थना करतो की आम्हाला आणखी एक संधी मिळाली पाहिजे. 

ऐश्वर्या राय-बच्चन सोबत स्क्रीनवर काम करताना कधी दिसणार आहेस?
- दररोज तर आम्ही एकत्र घरी काम करतो (हसत हसत म्हणाला). मलादेखील ऐश्वर्या सोबत काम करायचे आहे. आम्हाला जेव्हा चांगली स्क्रिप्ट मिळेल तेव्हा 
आम्ही नक्कीच एकत्र काम करू.

आगामी प्रोजेक्टबद्दल सांग?
नुकतेच एका चित्रपटाचे शूटिंग करतो आहे. या चित्रपटाचे नाव आहे 'घूमर;. या चित्रपटाचे दिग्दर्शन आर. बाल्की करत आहेत.  त्यानंतर वेबसीरिज 'ब्रीद'चे पुढील सीझनचे शूटिंग पूर्ण झाले आहे. माझी निर्मिती असलेला तिसरा चित्रपट 'ट्रिपल एस 7'चे पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे. शूट पूर्ण झाले आहे आणि मी देखील यात अभिनय करताना दिसणार आहे.

Web Title: Abhishek Bachchan says - 'Dasvi' movie is very special for me, find out about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.