"वडील मुलांसाठी जे करतात त्याविषयी...", अभिषेक बच्चनचे शब्द ऐकून Big B भावुक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 11:59 AM2024-11-19T11:59:54+5:302024-11-19T12:00:57+5:30
अभिषेक बच्चन नुकताच 'कौन बनेही करोडपती' मध्ये आला होता.
अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आगामी I want to talk या शूजित सरकारच्या सिनेमात दिसणार आहे. नुकतंच त्याने वडील अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती' शोमध्ये हजरी लावली. यावेळी तो वडिलांबद्दल असं काही बोलला ज्यामुळे बिग बी भावुक झाले. अमिताभ बच्चन वयाच्या ८२ व्या वर्षीही ज्याप्रकारे काम करत आहेत हे खरोखरंच वाखणण्याजोगं आहे. अभिषेकलाही पित्याच्या या कष्टाची जाणीव आहे जी त्याने या शोमध्ये व्यक्त केली.
केबीसीमध्ये अभिषेक बच्चन म्हणाला, "मला माहित नाही इथे हे सांगणं योग्य आहे की नाही पण मला आशा आहे लोक मला समजून घेतील. आज आपण आत्ता इथे बसलोय आणि रात्रीचे १० वाजले आहेत. माझे वडील सकाळी साडेसहा वाजताच घरातून बाहेर पडले आहेत. जेणेकरुन आम्ही सगळे आरामात ८-९ वाजता उठू शकू. एक पिता आपल्या मुलांसाठी काय काय करतो याविषयी कोणीच जास्त बोलत नाही. कारण प्रत्येक बाप चुपचाप ते करत असतो."
हे ऐकून अमिताभ बच्चन खूप भावुक झालेले दिसले. ११ ऑक्टोबरला अमिताभ बच्चन यांनी ८२ वा वाढदिवस साजरा केला. मात्र त्यांचा उत्साह, कामाची गती ही तरुणांनाही लाजवणारी आहे. आजही केबीसीच्या सेटवर ते त्याच एनर्जीने येतात हे पाहून आश्चर्य वाटते.
अमिताभ यांचा 'कल्कि २८९८ AD' काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला. यामध्ये त्यांच्या अभिनयाने अगदी प्रभासलाही मागे टाकलं. तर अभिषेकचा I want to talk सिनेमा २२ नोव्हेंबर रोजी रिलीज होत आहे.