"आयुष्याच्या चौकटीत अडकलो...", सिनेमाच्या प्रमोशनवेळी अभिषेक बच्चनने व्यक्त केल्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 01:35 PM2024-11-14T13:35:35+5:302024-11-14T13:36:43+5:30
आगामी सिनेमाच्या म्युझिक लाँच सोहळ्यात अभिषेक बच्चन बोलत होता. आयुष्यातील बदलांविषयी केलं भाष्य
अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आगामी I want to talk सिनेमात दिसणार आहे. याचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. सिनेमात त्याचा आजपर्यंतचा सर्वात वेगळा लूक पाहायला मिळत आहे. 'पिकू', 'पिंक', 'ऑक्टोबर' असे हिट सिनेमे देणाऱ्या शूजीत सरकार (Shoojit Sarkar) यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. कालच सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा पार पडला. यावेळी दिग्दर्शक, कलाकारांनी त्यांचा अनुभव शेअर केला. यावेळी अभिषेक बच्चन काय बोलतो याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. काय म्हणाला अभिषेक?
I want to talk च्या म्युझिक सोहळ्यात अभिषेक बच्चनला स्टेजवर बोलवण्यात आले. शूजित सरकारसोबत काम करण्याच्या अनुभवावर तो म्हणाला, "शूजित दांसोबत काम करण्याची संधी मिळणं ही कोणत्याही कलाकारासाठी नशिबवान बाब आहे. त्याच्या सिनेमात काम करताना स्वत:मध्ये अनेक बदल होतात. फक्त शारिरीक बदल नाही जे तुम्ही सिनेमात पाहिले. पण शूजितसोबत काम करताना खूप शिकायला मिळतं, आयुष्य बदलतं. आम्ही खूप प्रामाणिकपणे आणि मेहनतीने हा सिनेमा बनवला आहे त्यामुळे तुम्हाला नक्की मजा येईल. त्याने यासाठी माझी निवड केली याचा मला अभिमान वाटतो."
भावनिकरित्या सिनेमात काम करणं आव्हानात्म होतं का?यावर तो म्हणाला, "नक्कीच होतं. प्रत्येक सिनेमात हे आव्हान हवंच. कलाकार म्हणून काम करताना तुम्हाला नवीन करायची संधी मिळते, मर्यादेपलीकडे काहीतरी करायला मिळतं. या सिनेमात काम करतानाही ते आव्हान होतं आणि मला ते निभावताना मजा आली."
तो पुढे म्हणाला, "पुन्हा मला सिनेमासाठी वजन वाढवायला सांगू नका(हसत). खरंच या वयात वजन कमी करणं खूप कठीण आहे. आपण सगळेच आयुष्याच्या चौकटीत अडकलो आहोत. याच्याशी प्रत्येक जण सहमत असेलच. कोणी कॉर्पोरेट नोकरीत आहे कोणी कलाकार आहेत. आयुष्य तुम्हाला शिकवतं की तुम्ही काय आणि कसं केलं पाहिजे. शूजितसोबत काम करताना मला जाणवलं की आपण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करु शकतो. Fear free राहणं, एखादं डान्स रुटीन करणं, कधी आयुष्यात एखादा मार्ग निवडणं आणि काहीतरी वेगळं करणं हे मी त्याच्याकडून शिकलो."
आयुष्यात I want to talk म्हणत काही सांगायचं आहे का? यावर तो म्हणाला, "मला वाटतं आयुष्यात जे काही कराल ते संस्मरणीय असावं. मग यश येवो किंवा अपयश हे तुमच्या हातात नाही. पण तुम्ही जे करताय ते करताना येणारी मजा, अनुभव हे संस्मरणीय आहे. मी जे काही काम करतो ते याच विचाराने करतो की काही वर्षांनी मी हेच पुन्हा पाहीन तेव्हा मला चांगलं वाटेल."
22 नोव्हेंबर रोजी I want to talk रिलीज होत आहे. सिनेमात अभिषेक बच्चन, जॉनी लिव्हर, जयंत कृपालानी आणि अहिल्या बामरु यांचीही भूमिका आहे.