अकलूजची हीरोइन, तालमीतला हीरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2016 02:51 AM2016-04-27T02:51:26+5:302016-04-27T02:51:26+5:30

करमाळा परिसरात झालेले शूटिंग आणि हॉलीवूडमधील रेकॉर्डिंग असलेल्या ‘सैराट’चा प्रवास लेखक-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी उलगडला.

Achul's heroine, Talamitla hero | अकलूजची हीरोइन, तालमीतला हीरो

अकलूजची हीरोइन, तालमीतला हीरो

googlenewsNext

शिंग हीरोइन शोधताना अकलूजमधील एका शाळकरी मुलीमध्ये दिसलेली आर्ची, तालमीमध्ये शोधलेला देखणा नायक, करमाळा परिसरात झालेले शूटिंग आणि हॉलीवूडमधील रेकॉर्डिंग असलेल्या ‘सैराट’चा प्रवास लेखक-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी उलगडला. चित्रपटातील परशा असो की आर्ची, सगळ्यांमध्ये मीच आहे, असे सांगत समाजातील दाहक वास्तवाचे चित्रण करण्यामागची भूमिकाही त्यांनी मांडली.
‘सैराट’च्या टीमने लोकमत कार्यालयाला भेट दिली. मंजुळे यांच्यासोबत चित्रपटातील हीरो-हीरोइन आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू या वेळी उपस्थित होते.
‘सैराट’ची कहाणी सांगताना समाजाचे वास्तवच मांडताना आपल्या आयुष्यातील घटनांचा संदर्भ देत मंजुळे म्हणाले, ‘‘रूढ परंपरांना छेद देणारी नायिका हवी होती. कारण यातील आर्ची म्हणजे एकदम बिनधास्त आहे. मुलीने बिनधास्त का असू नये? लाजरंबुजरंच का असावं? एखादा मुलगा तिला आवडला तर तिने स्पष्टपणे का सांगू नये? हे प्रश्न मला पडले. अगदी तशीच आर्ची रिंकूने रंगवली आहे. आर्चीचा शोध घेण्यासाठी मी अनेक आॅडिशन घेतल्या. एकदा अकलूजला गेलो होतो. शाळकरी वयातील रिंकू वडिलांबरोबर भेटायला आली. तिला पाहिलं आणि जाणवलं हीच आर्ची.’’
चित्रपटातील नायक परशा शोधण्यासाठीही पुण्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये फिरलो. शेवटी पुण्याचाच असणारा, पण करमाळ्यात तालमीसाठी गेलेला आकाश दिसला. आर्चीपेक्षा परशा देखणा हवा होता. त्याचे कॅरेक्टरही साधे आहे. मुलगा म्हटला की, तो डॅशिंगच का पाहिजे? हा प्रश्न येथेही होता.’’
या दोन वेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून पारंपरिक विचारात जखडलेल्या समाजात हळुवार फुलणारी प्रेमकथा सैराट या चित्रपटामधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘सैराट’ हा फॅन्ड्रीचा सीक्वेल नाही. काही धागे यामध्ये सापडतीलही. कारण मी स्वत:ला मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सैराट म्हणजे मुक्तपणा आहे. मोकळीक मिळणे आणि आपल्या मनाला जे वाटेल ते करणे म्हणजे सैराट. त्यामुळे तोच मोकळेपणा या चित्रपटातून दिसणार आहे. येत्या २९ एप्रिल रोजी प्रेक्षकांना झिंगाट करण्यासाठी नवोदित कलाकार रिंकू राजगुरू व आकाश ठोसर यांची सैराट प्रेमकथा नागराज मंजुळे प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहेत.
>करमाळ्यातील कथेला वैश्विक परिमाण
‘सैराट’चे स्क्रीनिंग बर्लिनमध्ये झाले होते. खूप मोठे कल्चरल सेंटर होते. वाटले लोक कशाला येताहेत? पण गोष्ट कोणाचीही असली तरी वैश्विक परिमाण असेल तर ती सगळ्यांना आवडते. संपूर्ण सभागृह भरले होते, असे मंजुळे यांनी सांगितले.
>रिंकूने वाढविले वजन
सातवीतील रिंकू पाहिली आणि नागराज मंजुळेंना आर्ची सापडली. मात्र, त्यांनी वर्षभर तिच्याकडून तयारी करून घेतली. आठ-नऊ किलो वजन वाढविण्यास सांगितले. रिंकू म्हणाली, ‘‘मुली कशा बोलतात, कशा बघतात हे मला कळायचं नाही. नागराजदादाने माझे खाणेपिणे, व्यायाम कसा करायचा, हे सांगितले आणि एका वर्षाने मला बोलावले. डिसेंबर २०१३मध्ये मला या चित्रपटासाठी ‘तुला निवडले’ असे सांगण्यात आले.’’
>‘झिंगाट’च्या जोशपूर्ण नाचाची कथा
‘झिंगाट’ गाण्यावरील जोशपूर्ण नाचाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. आकाश म्हणाला, ‘‘हा खरं तर फुलआॅन गणपती डान्स; पण तो नागराज मंजुळे यांनी जोशपूर्ण करून घेतला आहे.’’ आकाश ठोसर म्हणतो, ‘‘झिंगाटच्या वेळी शूट करताना माझे मित्र मला ड्रिंक केलंय का, हेदेखील विचारायचे. पण ते गाणंच असं असल्यामुळे आम्ही फुलआॅन गणपती डान्स केला.’’ मंजुळे म्हणाले, ‘‘शूटिंग सुरू असताना आकाश, रिंकू आणि परशाची भूमिका करणारा मुलगा जो खरोखर अपंग आहे ते नाचायचे. त्यांना सांगितलं, की तशाच स्टेप ठेवा. ताजेपणा असल्यानं प्रेक्षकांना तो पसंत पडत आहे.’’

Web Title: Achul's heroine, Talamitla hero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.