कुछ तो गडबड है दया! गाजलेली CID मालिका आता मराठीत; लवकरच होणार सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 01:38 PM2024-10-16T13:38:17+5:302024-10-16T13:39:48+5:30
आता एसपी प्रद्युमन आणि त्यांची टीम मराठीतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. CID आता मराठीतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
टेलिव्हिजनवरील सगळ्यात लोकप्रिय आणि आवडती क्राइम सीरिज म्हणजे सीआयडी (CID). एसपी प्रद्युमन, इनस्पेक्टर दया आणि अभिजीत अशी सगळीच पात्र हिट ठरली होती. टीमबरोबर मिळून एसपी प्रद्युमन घडलेल्या गुन्ह्याचा तपास करत सत्य शोधून काढायचे. ९०च्या दशकातील या मालिकेने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. आता एसपी प्रद्युमन आणि त्यांची टीम मराठीतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
CID आता मराठीतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आधी सोनी टीव्हीवर CID ही मालिका प्रसारित व्हायची. आता मराठीतून ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. सोनी मराठी या चॅनेलवर CID ही मालिका मराठीत दाखवली जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता त्यांची आवडती क्राइम सीरिज मराठीतून पाहता येणार आहे. नुकतंच सोनी मराठीच्या ऑफिशियल पेजवरुन याबाबत पोस्ट करण्यात आली आहे.
CID या क्राइम सीरिजचा पहिला भाग २१ जानेवारी १९९८ रोजी प्रसारित करण्यात आला होता. या टीव्ही मालिकेने तब्बल २० वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. १ हजार ५४७ भाग प्रसारित झाल्यानंतर CID ने २०१८ मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत एसपी प्रद्युमनची भूमिका शिवाजी साटम यांनी साकारली. तर दयानंद शेट्टी इन्स्पेक्टर दया तर आदित्य श्रीवास्तव सिनियर इन्स्पेक्टर अभिजीतच्या भूमिकेत होते. CIDमधील "दया कुछ तो गडबड है", "दया तोड दो ये दरवाजा" हे डायलॉग आजही लोकप्रिय आहेत. अजूनही सोनी चॅनेलवर CIDचं प्रसारण केलं जातं.