एअर इंडिया कपिला शर्माविरोधात करणार कारवाई?
By Admin | Published: March 28, 2017 11:41 AM2017-03-28T11:41:51+5:302017-03-28T11:45:59+5:30
कॉमेडियन कपिल शर्माच्या अडचणीत आणखी भर पडणार असल्याचं दिसत आहे. एअर इंडिया काय करणार कपिलविरोधात कारवाई?
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - कॉमेडियन कपिल शर्माच्या अडचणीत आणखी भर पडणार असल्याचं दिसत आहे. 16 मार्च रोजी एअर इंडियाच्या विमानाने मेलबर्नहून दिल्लीकडे परत येताना कपिलने आपला को-स्टार सुनील ग्रोव्हरसोबत भांडण करत त्याला बेदम मारहाण केली होती. याप्रकरणात एअर इंडिया कपिलविरोधात कारवाई करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे प्रमुख अश्वनी लोहानी यांनी कपिल शर्मा- सुनील ग्रोव्हर वाद प्रकरणी अहवाल मागवला आहे. कपिलच्या बेशिस्त वर्तनामुळे एअर इंडिया त्याला नोटीसही जारी करण्याची शक्यता आहे. सेलिब्रिटी आणि व्हीव्हीआयपी लोकांच्या मनमानी कारभारामुळे सध्या एअर इंडियाच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नुकतंच शिवसेनेचे खासदार रविंद्र गायकवाड यांनीही कंपनीच्या कर्मचा-यासोबत वाद झाला होता.
तर दुसरीकडे, सुनील ग्रोव्हरसोबत झालेल्या वादामुळे आठवड्याअखेर लोकांना हसवणारा कपिल सध्या दुःखी असल्याचं दिसत आहे. कारण 'द कपिल शर्मा शो' मधील प्रसिद्ध कलाकारांची गैरहजेरी आणि बॉलिवूडकर शोमध्ये येण्यास नकार देत आहेत. त्यामुळे करिअर उद्धवस्त होऊ नये, यासाठी कपिल खूप मेहनत करताना दिसत आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
काही दिवसांपूर्वी कपिल शर्मा आपल्या सहकलाकारांसोबत ऑस्ट्रेलियाहून मुंबईमध्ये परतत होता. 'द कपिल शर्मा शो'ची टीम सिडनी आणि मेलबर्न मध्ये शो करण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये गेली आहे. यात सुनील ग्रोव्हरचाही सहभाग होता. ही सर्व मंडळी बिजनेस क्लासमधून प्रवास करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, कपिल शर्मा यावेळी मद्यधुंद अवस्थेत होता. नशेच्या अवस्थेत त्याने सुनीलसोबत गैरवर्तन करत त्याला मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी कपिलनं सुनिलचा अपमान करत, 'तू कोण आहे?, तुझा शो फ्लॉप झाला होता, तू माझा नोकर आहे, ऑस्ट्रेलियातीलही तुझा शो फ्लॉप होता, असे बोलत कपिलने सुनिलला मारहाण केली. या घटनेमुळे विमानातील काही प्रवासी घाबरल्याने त्यांनी विमान तात्काळ लँड करण्याची मागणी केली होती.
कपिलचा गोंधळ वाढल्यानंतर कर्मचा-यांनी हस्तक्षेप करुन कपिलचा राग शांत केला. कपिलनेसुद्धा त्यावेळी माफी मागितली. पण त्यानंतर पुन्हा थोड्यावेळाने कपिल आपल्या आसनावरुन उठला आणि आपल्या सहकलाकारांवर आरडाओरडा करायला लागला. अखेर वैमानिकाने हस्तक्षेप करुन कपिलला शांत राहाण्याचा इशारा दिला. त्यानंतर पुढच्या प्रवासात कपिलने कुठलाही वाद घातला नाही. भारतात येईपर्यंत तो झोपूनच होता, असे सूत्रांनी सांगितले.