नाट्य परिषद निवडणुकीत विजयी ठरलेल्या प्रशांत दामलेंचा 'ॲक्शन प्लॅन'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 11:40 AM2023-04-23T11:40:12+5:302023-04-23T11:40:32+5:30
काय करायचं नाही, हे शिकलो
प्रशांत दामले, अभिनेते - नाट्यनिर्माते
आम्हा सर्वांचं पूर्वीही आपापल्या परीने छोट्या कॅनव्हासवर काम सुरू होतं. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची निवडणूक लढविण्यामागील मुख्य कारण म्हणजे परिषदेच्या माध्यमातून मोठ्या कॅनव्हासवर काम करायला मिळाल्यास रंगभूमीशी संबंधित सर्व घटकांसाठी काम करू शकतो, याची जाणीव झाली. इच्छा तेथे मार्ग यानुसार संधी मिळाली आहे. डोक्यात असलेल्या योजना ‘फाइन ट्यून’ करून काम सुरू करायचं आहे. अगोदर काय झालं यावर भाष्य करायचं नसल्याचं अगोदरच ठरवलं होतं. त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. खूप वेळ जातो. फोकस चेंज होतो. काय करायचं त्यावर लक्ष केंद्रित केलं की बरं पडतं. त्यामुळे निवडणुकीत आमच्याकडून कोणतेही आरोप केले गेले नाहीत. त्यांनी केले, पण आम्ही केले नाहीत.
नाट्य परिषदेकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यासाठी छान टीम तयार झाली आहे. आता काम करायचं आहे. मागच्या काळात खटकलेल्या गोष्टी खूप होत्या, पण त्याबद्दल आता बोलून काहीच उपयोग नाही. त्यातून धडा घ्यायला हवा. कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत हे शिकलो. चांगल्या गोष्टी करण्यासाठी काय करावं हे शिकलो. सर्वप्रथम नाट्य परिषद आणि त्याच्याशी संलग्न संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवायचं आहे. भविष्यात पुन्हा कोरोनासदृश परिस्थिती निर्माण झाली तर कोणाकडे हात पसरण्याची वेळ येता कामा नये. मागे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे खूप गोंधळ झाला होता.
नाट्यगृहाचे भाडे कसे कमी करता येईल?
दुसरी गोष्ट म्हणजे सातत्याने निर्मात्यांकडून नाट्यगृहांचं भाडं कमी करण्याची मागणी केली जाते. भरमसाठ भाडे देऊन निर्मात्यांनी नाटकांचे प्रयोग कसे करायचे? हा प्रश्न आहे. सुखसोयींसाठी पैसे मोजावे लागतात हे खरं आहे; पण भाडं कमी करायचं असेल तर सर्व नाट्यगृहांवर सोलार सिस्टम बसवावी. त्यामुळे विजेचा खर्च कमी होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रात अगदी पाच हजार रुपये भाड्यानेही नाट्यगृह मिळू शकेल. नाट्यगृहांचा सर्वांत जास्त खर्च विजेवर होतो. हा मुद्दा रंगकर्मी, रसिक आणि निर्माते या तिघांच्याही सोयीचा आहे.
मुंबईत येणाऱ्या रंगकर्मींची राहण्याची सोय
महाराष्ट्रातून मुंबईत येणाऱ्या रंगकर्मींना महागड्या भाड्याच्या खोलीत राहावे लागते. त्यापैकी काहींना राहण्याची सोय करून देणं ही देखील नाट्य परिषदेची जबाबदारी आहे. त्यासाठी महानगरपालिकेच्या बंद पडलेल्या शाळा वापरू शकतो. नाट्य संकुल म्हणजेच यशवंत नाट्यगृह पुन्हा बांधावे लागणार का, याची प्रथम पडताळणी केली जाईल, त्यानंतर निर्णय घेण्यात येईल. नाट्य संकुल सुरू व्हावं हीच या क्षणी भावना आहे. बालरंगभूमी आणि प्रायोगिक रंगभूमीमुळे व्यावसायिक रंगभूमी आहे. त्यांच्यासाठी काम करावच लागेल.
कोणीही १०० टक्के परफेक्ट नसतं
आम्ही सर्व मूळचे रंगकर्मी आहोत, राजकारणी नाही. प्रसाद कांबळी निर्माता असल्याने उद्या मी त्याच्या नाटकातही काम करू शकतो. तसा आमचा कोणाचाही वाद नाही. कोणीही शंभर टक्के परफेक्ट नसतं हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. मी देखील नाही. निवडून आलेले ६० जण ठरवतील तो अध्यक्ष होईल. मला संधी मिळाली तर नक्कीच चांगलं काम करेन हे मी अगोदरच म्हटलं होतं. त्यात कुठेही कमी पडणार नाही.