प्रेमासाठी वाट्टेल ते! फक्त ५० रुपयांत झालं होतं आदेश-सुचित्राचं लग्न; फिल्मी आहे त्यांची लव्हस्टोरी...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 11:41 AM2023-01-18T11:41:16+5:302023-01-18T11:41:49+5:30
Aadesh bandekar :एकेकाळी प्रेमासाठी वाट्टेल ते! असं म्हणत आदेश बांदेकर आणि सुचित्रा यांनी चक्क ५० रुपयात लग्न केलं. विशेष म्हणजे या जोडीतील प्रेम आजही अबाधित असून ते एकमेकांची साथ देताना दिसतात.
महाराष्ट्राचे लाडके 'भावोजी' म्हणून ओळख मिळवणारे आदेश बांदेकर १८ जानेवारी ५७ वा वाढदिवस साजरा करत आहेत. 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमातून ते घराघरात पोहोचले. अभिनेता म्हणून सुरु झालेला आदेशचा प्रवास आज महाराष्ट्राचे लाडके भावोजी इथपर्यंत येऊन पोहोचला आहे. आदेश बांदेकर होम मिनिस्टरच्या माध्यमातून प्रत्येक गृहिणीच्या घरी जात तिची सुख-दु:ख वाटून घेतात. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येक प्रेक्षकांमध्ये आदराची भावना आहे. त्यामुळेच कार्यक्रमाच्या माध्यमातून इतरांच्या लव्हस्टोरी जाणून घेणाऱ्या भावोजींची लव्हस्टोरी नेमकी कशी आहे हा प्रश्न अनेकांना पडतो. आज आदेश यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्यांची लव्ह स्टोरी!
आदेश-सुचित्राची भन्नाट लव्हस्टोरी
अभिनेता आदेश बांदेकर यांनी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांच्यासोबत लग्न केलं आहे. त्यांनी सोहम हा मुलगादेखील असून आता तोदेखील कलाविश्वात सक्रीय झाला आहे. मात्र, या जोडीमधील प्रेम आणि मैत्री कायम चर्चेचा विषय ठरते. आदेश आणि सुचित्रा यांची लव्हस्टोरी एकदम फिल्मी स्टाइलची आहे. सुचित्रा ९वी मध्ये शिकत असल्यापासून आदेश यांचं त्यांच्यावर प्रेम होतं. याच काळात 'रथचक्र' या मालिकेत सुचित्रा काम करत असताना आदेश यांनाही या मालिकेत काम करायची संधी मिळाली. त्यावेळी आदेश यांना पाहून सुचित्रा त्यांच्या प्रमात पडल्या. पण त्यांनी त्यांचं प्रेम कधी व्यक्त केलं नाही. एकीकडे मालिकेचं चित्रीकरण सुरु असताना आदेश अनेकदा सुचित्रा यांच्या शाळेच्या परिसरात जायचे. त्यामुळे माझा पाठलाग करु नकोस. मी काही तुला होकार देणार नाही, असं सुचित्रा यांनी बजावलं होतं.
पण, आदेश यांनी सुचित्रा यांना दादरच्या एक हॉटेलमध्ये भेटायला बोलवले. सुचित्रा आदेश यांना भेटायला जाण्यासाठी एका मैत्रिणीला सोबत घेऊन निघाल्या. पण त्यांना भीती वाटत असल्याने त्या हॉटेलमध्ये न जाता दादरमध्ये दुसरी कडेच फिरत राहिल्या. या काळात आदेश बराच काळ त्यांची वाट पाहत बसले. पण, त्या काही आल्याच नाहीत. त्यामुळे अखेर आदेश यांनी सुचित्रा यांचं घर गाठलं. मात्र, सुचित्रा घरीही नव्हत्या. काही वेळात सुचित्रा घरी आल्यावर बघतात. तर आदेश आणि सुचित्राची आई गप्पा मारत होते. हा धक्कादायक प्रकार पाहून त्या पार गोंधळून गेल्या होत्या. त्यानंतर त्यांची आई काही कामानिमित्त बाहेर गेली. ही संधी पाहून आदेश यांनी रागाच्या भरात सुचित्राला थेट एक प्रश्न विचारला. "जर हो असेल तर हो म्हण. आणि, नकार असेल तर तसं कळव. यापुढे मी पुन्हा तुला विचारणार नाही. आज मी तुला महालक्ष्मीला घेऊन जाणार होतो. मी तुला पाच मिनिटे देतो मला उत्तर दे",असे आदेश म्हणाले. त्यावर काही काळ थांबून ''महालक्ष्मीला कधी जायचे?'' असं प्रश्न विचारत सुचित्रा यांनी होकार दिला.
५० रुपयांत आदेश-सुचित्राचं झालं लग्न
आदेश आणि सुचित्रा यांचं जरी एकमेकांवर प्रेम असलं तरीदेखील या लग्नाला सुचित्रा यांच्या घरातून विरोध होता. कारण, त्या काळात आदेश बांदेकर इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करत होते. पण, घरातल्यांच्या विरोधाला न जुमानता सुचित्राने त्यांच्या सोबत लग्न केलं. 'मी क्लासला जाते', असे सांगून त्या घरातून निघाल्या आणि आदेशला भेटल्या. त्यानंतर या दोघांनी बांद्रा कोर्टात जाऊन लग्न केलं. विशेष म्हणजे त्याकाळी त्यांच्या लग्नाचा खर्च केवळ ५० रुपये इतकाच आला होता.