अभिनेते अरुण सरनाईक जयंती

By Admin | Published: October 4, 2016 04:04 PM2016-10-04T16:04:38+5:302016-10-04T16:04:38+5:30

विख्यात अभिनेते अरूण शंकरराव सरनाईक यांची आज (४ ऑक्टोबर) जयंती

Actor Arun Sarnayak Jayanti | अभिनेते अरुण सरनाईक जयंती

अभिनेते अरुण सरनाईक जयंती

googlenewsNext
>- प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. ४ -  विख्यात अभिनेते अरूण शंकरराव सरनाईक यांची आज (४ ऑक्टोबर) जयंती. त्यांनी मराठी चित्रपट व नाटकांतून अभिनय केला. इ.स. १९६१ सालच्या शाहीर परशुराम या चित्रपटातील पूरक भूमिकेद्वारे त्यांनी चित्रपटसॄष्टीत पदार्पण केले. त्यांनी भूमिका साकारलेले रंगल्या रात्री अशा, एक गाव बारा भानगडी, मुंबईचा जावई, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, सिंहासन इत्यादी चित्रपट विशेष गाजले.
 
एका परिपूर्ण अभिनेत्याकडे ज्या काही गोष्टी लागतात, त्या सर्वांचा अंतर्भाव सरनाईक यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये पाहायला मिळाला होता. 
 
लहान अरुणच्या घरातच कला होती. अरुणचे वडील शंकरराव सरनाईक हे संगीतज्ज्ञ होते तर त्याचे काका निवृत्तीबुवा सरनाईक हे प्रख्यात शास्त्रीय गायक. गाण्याचं हे अंग अरुणला या जोडीकडूनच मिळालं. त्यामुळे अभिनयात नावारूपास येण्यापूर्वीच अरुणनं पेटी, तबल्यात मातब्बरी मिळवली होती. संगीताची हीच आवड अरुणला कलाक्षेत्रातील दारं उघडण्यास उपयोगी ठरली. तत्पूर्वी मुंबईच्या रुईया महाविद्यालयामधून त्यानं पदवीही मिळवली. तसेच थेट कलाक्षेत्रात उडी न मारता इचलकरंजीला एका कारखान्यात व्यवस्थापक म्हणूनही काही काळ काम पाहिलं. परंतु, तिथं त्याचा जीव काही रमला नाही. याच सुमारास मो. ग. रांगणेकर हे "भटाला दिली ओसरी' हे नाटक बसवीत होते. या नाटकात अरुणनं काम केलं. याच वेळी एक उत्कृष्ट संधी अरुणपुढे चालून आली. विख्यात दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या डोक्‍यात शाहीर प्रभाकर हा चित्रपट करण्याचं घोळत होतं. यातील शीर्षक व्यक्तिरेखा अरुणनं साकारावी, असं त्यांच्या मनात होतं. परंतु, हा चित्रपट काही कारणांमुळे बनला नाही आणि अरुणचं चित्रपटसृष्टीतील पदार्पण काही काळ लांबलं. परंतु, मातीत पडलेलं सोनं फार काळ दृष्टीभेद करू शकत नाही. या सोन्यावर प्रख्यात लेखक-दिग्दर्शक अनंत माने यांची नजर गेली आणि त्यांनी 'शाहीर परशुराम' चित्रपटात अरुणला एक दुय्यम भूमिका मिळाली. या भूमिकेपाठोपाठ लेखक-दिग्दर्शक दिनकर द. पाटील यांचा वरदक्षिणा आणि दत्ता धर्माधिकारी यांचा विठू माझा लेकुरवाळा हा चित्रपटही अरुणला मिळाला. परंतु, हे तिन्ही चित्रपट फार काही मोठं यश मिळवू शकले नाहीत. एक देखणा, रुबाबदार नायक चांगल्या संधीविना उपेक्षित राहणार, अशी भीतीही निर्माण झाली. परंतु, त्यानंतर आलेल्या "रंगल्या रात्री अशा' या चित्रपटानं किमया केली आणि अरुणचा अरुणोदय झाला. या चित्रपटानं सरनाईकांना मोठा फॅन फॉलोअर मिळाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे या काळातले मोठे चाहते ठरले. या चित्रपटासाठी प्रख्यात तबलावादक उस्ताद अल्लारखॉं यांनी तबलावादन केलं होतं. प्रत्यक्ष चित्रपटात तबल्यावरील सरनाईकांची सफाई पाहून अल्लारखॉंनी त्यांचं कौतुक केलं होतं. त्यापुढं जात शिवसेनाप्रमुखांनी या कलावंताचा भविष्यकाळ उज्ज्वल असल्याचं भाकीत केलं आणि नंतर ते खरं ठरलं.
 
प्रतिभा असूनही नवीन कलाकाराला आपला जम बसविणं सहजासहजी शक्‍य नसतं. कारण, त्याच्यापुढे त्या काळातील मोठमोठी आव्हानं उभी असतात. सरनाईकांचा अरुणोदय झाला तेव्हा चंद्रकांत, सूर्यकांत, विवेक, रमेश देव यासारख्या अभिनेत्यांची कारकीर्द विशेष फॉर्मात होती. त्यामुळे सरनाईकांची डाळ शिजणं हे थोडं कठीण काम होतं. परंतु, बुलंद आवाज, अभिनय आणि संवादफेकीच्या जोरावर हा कलावंत बघताबघता इतरांच्या पुढं गेला. त्या काळातला चित्रपट हा ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही प्रकारच्या कथानकांच्या उंबरठ्यावर होता. सरनाईकांनी या दोन्ही प्रकारांमध्ये मातब्बरी मिळवली. सुरुवातीच्या काळातच त्यांनी भूमिकांची प्रयोगशीलता जपली. राजा ठाकूर दिग्दर्शित "पाहू रे किती वाट' या चित्रपटात ते डॉ. चारुदत्त या नायकाच्या व्यक्तिरेखेत झलकले तर "सुभद्राहरण' या चित्रपटात त्यांनी थेट दुर्योधनाचा खलनायक साकारला. सरनाईकांची कारकीर्द उंचावली जाण्यास कारणीभूत ठरलेले चित्रपट म्हणजे एक गाव बारा भानगडी, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, सिंहासन आदी चित्रपट. सवाल माझा ऐकामधील त्यांचा ढोलकीवाला जयवंत आजही रसिकांच्या लक्षात आहे. असाच ढोलकीवाला त्यांनी केला इशारा जाता जाता' या चित्रपटातही साकारला होता. पाच नाजूक बोटे या चित्रपटात सरनाईकांनी सज्जन आणि दुर्जन भावांची दुहेरी भूमिका मोठ्या ताकदीनं सादर केली. मुंबईचा जावईमधील सरनाईकांचा नाट्यवेडा अविनाश लक्षणीय ठरला. डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित सिंहासनमधील जयाजीराव शिंदे ही मुख्यमंत्र्यांची व्यक्तिरेखा सरनाईकांच्या कारकीर्दीमध्ये सरताज ठरली. 
 
मुख्यमंत्र्याच्या व्यक्तिमत्त्वासाठी आवश्‍यक असलेले भावदर्शन सरनाईकांनी या व्यक्तिरेखेत एकवटले होते. सरनाईकांमधील संगीताचा आविष्कार पडद्यावर आणण्यास कारणीभूत ठरले ते संगीतकार राम कदम. डोंगरची मैना आणि गणगौळण या दोन चित्रपटात कदम यांनी सरनाईकांना पार्श्‍वगायनाची संधी दिली. घरकुल या चित्रपटासाठी सी. रामचंद्र यांनी त्यांच्याकडून पप्पा सांगा कुणाचे हे अजरामर गीत गाऊन घेतलं. त्यानंतर काही वर्षांनी आलेल्या चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटामधील एक लाजरा न साजरा मुखडा चंद्रावाणी फुलला गं हे गाणंही सरनाईकांमधील श्रेष्ठ गायकावर शिक्कामोर्तब करणारं ठरलं. सरनाईकांचं अभिनयातील कर्तृत्व पाहता ते हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांना ताकदीच्या भूमिका मिळायल्या हव्या होत्या. परंतु, मराठी चित्रपट आणि नाटकांमधील व्यस्ततेमुळे ही संधी काही त्यांना मिळाली नाही. अभिनयातील व्यस्तता एकीकडे कायम ठेवत सरनाईकांनी आपण समाजाचं देणं लागतो, या भावनेला छेद दिला नाही. 
 
चित्रीकरणातून वेळ मिळाला की कुष्ठरुग्णांसाठी काम करणाऱ्या "आनंदग्राम'मध्ये ते स्वतःला झोकून द्यायचे. तिथं खऱ्या अर्थानं ते रमले. तिथल्या आबालवृद्धांच्या हाती फळं, खाऊ देताना त्यांचा चेहरा आनंदानं ओसंडून वाहायचा.
 
सुमारे साडे तीन दशकांच्या कारकीर्दीत सर्व काही मिळवल्यानंतर सरनाईकांना वेध लागले होते ते निवृत्तीचे. शक्‍यतो कलाकार कधीच निवृत्त होत नसतो. मात्र, इतरांपासून वेगळा असणारा हा कलाकार गावी जाऊन शेती करण्याचे मनसुबे बांधत होता. आयुष्यभर धावपळ, दगदग झाल्यानंतर गावी घर बांधून तिथं थोडी विश्रांती घेण्याचाही त्यांचा विचार होता. परंतु, तो नियतीला काही मंजूर नव्हता. 21 जून 1984च्या पहाटे पंढरीची वारी या चित्रपटाचं चित्रीकरण आटोपून कोल्हापूर-पुणे असा आपल्या कुटुंबियांसमवेत प्रवास करीत असताना त्यांच्या मोटारीला अपघात झाला आणि हा कलावंत काळाच्या पडद्याआड गेला. त्यावेळी सरनाईकांचं वय पन्नाशीच्या आसपास होतं. वयानं आणखी काही वर्षं साथ दिली असती तर कदाचित या कलावंताकडून आणखी काही उत्कृष्ट कलाकृती आपल्याला पाहायल्या मिळाल्या असत्या.
 
सौजन्य : मराठी विकिपीडिया / इंटरनेट 
 

Web Title: Actor Arun Sarnayak Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.