Aryan Khan Drugs Case : तर मग हा समाज त्या लायकीचाच नाही..., समीर वानखेडेंवर आरोप करणाऱ्यांवर भडकला अभिनेता बिजय जे आनंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 01:07 PM2021-10-25T13:07:31+5:302021-10-25T13:09:13+5:30
Aryan Khan Drugs Case : आर्यन खान ड्रग्स प्रकरणाच्या निमित्ताने समीर वानखेडे यांच्यावर आरोप करणाऱ्यांवर बरसला अभिनेता बिजय जे आनंद, वाचा काय म्हणाला...
आर्यन खान ड्रग्स प्रकरणात (Aryan Khan Drugs Case) रोज नवे खुलासे होताना दिसत आहेत. या प्रकरणाच्या निमित्ताने एनसीबीचे (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede ) यांच्यावरही आरोप होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी तर एनसीबीने केलेली कारवाई फेक असल्याचा आरोप करत, समीर वानखेडे यांच्याबाबत खळबळजनक आरोप केले आहेत. अशात बॉलिवूडचा एक अभिनेता मात्र समीर वानखेडे यांच्या पाठिशी उभा झाला आहे. होय, बॉलिवूड अभिनेता बिजय जे आनंद ( Bijay J Anand ) याने समीर वानखेडे हे एक प्रामाणिक अधिकारी असल्याचं सांगत, त्यांचा बचाव केला आहे.
समीर वानखेडे यांच्यावरच्या आरोपांवर बिजय जे आनंदने जळजळीत प्रतिक्रिया दिली.
‘समीर वानखेडेसारख्या अतिशय प्रामाणिक व दक्ष अधिका-यावर तुम्ही बिनबुडाचे आरोप करत असाल, त्यांची बदनामी करत असाल तर मग आपला समाज या लायकीचाच नाही की आपल्याला एखादा प्रामाणिक अधिकारी किंवा नेता मिळू शकेल, ’असे बिजय म्हणाला.
'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत बिजयने समीर वानखेडे यांच्या कामगिरीचं कौतुक केलं. तो म्हणाला, ‘ ड्रग्जमुळे संपूर्ण पंजाब उद्ध्वस्त झालंय. 25 वर्षांपूर्वी मुंबईच्या पार्ट्यांमध्ये सर्रास ड्रग्सचं सेवन केलं जायचं. समीर वानखेडे ड्रग्जची हीच घाण साफ करत आहेत. आर्यन खानबद्दल मी काहीही बोलणार नाही. पण यानिमित्ताने एका प्रामाणिक अधिका-यावर बिनगुडाचे आरोप होत असतील तर तर मग आपला समाज या लायकीचाच नाही की आपल्याला एखादा प्रामाणिक अधिकारी किंवा नेता मिळू शकेल. समीर वानखेडे यांनी सीमा शुल्क विभागातही दमदार कामगिरी केली होती. त्यांची प्रचंड दहशत होती. सीमा शुल्क विभागानंतर ते आता एनसीबीमध्ये धडाकेबाज कामगिरी करत आहेत, असे बिजय आनंद म्हणाला.
‘माझी गाडी दुरुस्त करणारा साधा मेकॅनिकही तीन वेळा दुबईला जाऊन आला. तर मग एखाद्या अधिकारी परदेशवारी करू शकणार नाही का? समीर वानखेडे यांची पत्नी मोठी अभिनेत्री आहे. ते दुबईला गेले असतील तर त्यावर आक्षेप का? ते प्रामाणिक नाहीत, याचे पुरावे दाखवा, तरच मी मी तुमचं ऐकेन. नाहीतर त्या प्रामाणिक अधिका-याला त्याचं काम करू द्या,’असेही तो म्हणाला.
कोण आहे बिजय जे आनंद?
1998 साली आलेला ‘प्यार तो होना ही था’ हा सिनेमा तुम्हाला आठवत असेलच आणि या सिनेमातील काजोलचा ‘मंगेतर’ही आठवत असणारच. हाच तो बिजय जे आनंद.
‘प्यार तो होना ही था’ या सिनेमात बिजय काजोलसोबत स्क्रिन शेअर करताना दिसला होता. या सिनेमानंतर बिजय आनंदला अनेक चित्रपटाच्या ऑफर्स आल्यात. पण त्याने फार कमी सिनेमात काम केले. बिजय आनंदला वयाच्या 26 व्या वर्षी आर्थराइटिसने पीडित झाला होता.
या आजारानंतर बिजय आनंदने आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत केले आणि योगसाधना सुरु केली. पुढे तो यातच इतका रमला की, स्वत:चे योगा सेंटर सुरु केले. 1998 साली ‘औरत’ मालिकेत तो दिसला होता. त्यानंतर 2002 साली ‘रामायण’ या मालिकेत त्याने लक्ष्मणची भूमिका साकारली. त्यानंतर तब्बल सोळा वर्षे बॉलिवूड व टेलिव्हिजनमधून तो गायब झाला होता.
अचानक पुन्हा एकदा त्याने मालिकेतून कमबॅक केले. ‘दिल ही तो है’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारून पुनरागमन केले. त्यानंतर ‘सिया के राम’ मालिकेत त्याने राजा जनकची भूमिका साकारली होती. आता अभिनयातून वेळ काढत तो योगा शिबिरही घेत असतो. सोबत वेळ मिळेल तसा अभिनयही करतो.