अभिनेते, दिग्दर्शक सचिन पिळगावकर गणपतीपुळेला; ‘नवरा माझा नवसाचा २’साठी घेतले आशीर्वाद
By मनोज मुळ्ये | Published: February 25, 2024 01:16 PM2024-02-25T13:16:43+5:302024-02-25T13:17:23+5:30
मार्च महिन्यापासून या चित्रपटाचे चित्रिकरण रत्नागिरीमध्येच सुरू होणार आहे. गणपतीपुळे मंदिर, तेथील समुद्रकिनारा, गणपतीपुळे मार्गावरील ठिकाणे, रत्नागिरी रेल्वेस्थानक परिसर अशा ठिकाणी हे चित्रिकरण होणार आहे.
रत्नागिरी : तब्बल १९ वर्षांपूर्वी मराठी चित्रपट सृष्टीत दणदणीत यश मिळवलेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाने धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि प्रमुख अभिनेते यांनी ‘नवरा माझा नवसाचा २’ची घोषणा केली असून, या चित्रपटाचे कथानक त्यांनी गणपतीपुळे येथे श्रींच्या चरणी अर्पण केले.
मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ व दिग्गज अभिनेते सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर आणि अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका असलेला 'नवरा माझा नवसाचा' हा एव्हरग्रीन चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला आणि मराठी चित्रपट रसिकांनी तो डोक्यावर घेतला. या चित्रपटातील छोट्या भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. विजय पाटकर यांचा मुका अभिनय, हेल्मेट घातलेले वैभव मांगले, प्रख्यात गायक सोनू निगम यांनी गायलेले गाणे आणि त्यांचा चित्रपटातील सहभाग या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांच्या मनावर ठसल्या. आता 'नवरा माझा नवसाचा-२' चित्रपट येणार असून, त्याची स्क्रिप्ट सचिन पिळगांवकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह गणपतीपुळे येथे श्रींच्या चरणी ठेवली.
चित्रपटाच्या या नव्या भागातही ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अलीसागर, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार अशा दिग्गज कलाकारांची फौज आहे. या चित्रपटाच्या चित्रिकरणाचा शुभारंभ करण्यासाठी निमति- दिग्दर्शक, प्रमुख अभिनेते सचिन पिळगावकर यांनी गणपतीपुळे येथे भेट दिली. चित्रपटाची स्क्रिप्ट पिळगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी गणपतीचरणी ठेवली. यावेळी रत्नागिरीतील व्यावसायिक सचिन देसाई हेही उपस्थित होते. मार्च महिन्यापासून या चित्रपटाचे चित्रिकरण रत्नागिरीमध्येच सुरू होणार आहे. गणपतीपुळे मंदिर, तेथील समुद्रकिनारा, गणपतीपुळे मार्गावरील ठिकाणे, रत्नागिरी रेल्वेस्थानक परिसर अशा ठिकाणी हे चित्रिकरण होणार आहे.