जाळ न् धूर संगट! नागराज मंजुळेंसाठी किरण मानेंची खास पोस्ट; शेअर केले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 05:16 PM2022-04-25T17:16:07+5:302022-04-25T17:23:33+5:30
Kiran Mane And Nagraj Manjule : किरण माने यांनी आता दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची भेट घेतली आहे. या भेटीची काही फोटो फेसबुकवर शेअर करत त्यांनी एक खास पोस्ट लिहिली आहे.
मुंबई - स्टार प्रवाह (Star Pravah) या वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) या अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या मालिकेतून अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांना रातोरात काढून टाकण्यात आलं. सोशल मीडियावर राजकीय भूमिका घेतल्यानं आपल्याला मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचा आरोप किरण मानेंनी यानंतर केला होता. मात्र स्टार प्रवाह वाहिनी व मालिकेच्या निर्मात्यांनी त्यांचा हा आरोप धुडकावून लावत त्यांच्या गैरवर्तनामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचं म्हटलं होतं. हा वाद चांगलाच गाजला होता. किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात.
किरण माने यांनी आता दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांची भेट घेतली आहे. या भेटीचे काही फोटो फेसबुकवर शेअर करत त्यांनी एक खास पोस्ट लिहिली आहे. "जाळ न् धूर संगट!" असं म्हटलं आहे. किरण माने यांनी शेअर केलेल्या फोटोत दोघे गप्पा मारत असल्याचं दिसत आहे. तर दुसऱ्या एका फोटोत नागराज मंजुळे हे किरण माने यांचे पुस्तक हातात धरून त्यांचं कौतुक करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या असून ती खास पोस्ट सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे.
किरण माने यांनी काही दिवसांपूर्वी झुंड चित्रपटाबद्दल पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये मानेंनी झुंड आणि नागराज यांचं कौतुक केलं होतं. नागराज मंजुळे यांची एक कविताही शेअर केलेली. नागराज, लै लै लै वर्ष झाली. मी खाली पोस्ट केलेली तुझी, ‘ तुझ्या येण्याअगोदर’ एक पत्र ही कविता वाचून अस्वस्थ झालोवतो. आज या कवितेचं ‘महाकाव्य’ करून तू मोठ्या पडद्यावरुन मांडलंस आणि अख्खा देश हलवून सोडलास. भारतीय सिनेमाच्या दिग्दर्शन, स्क्रीनप्ले संवाद लेखनाच्या सगळ्या रूढ चौकटी मोडून-तोडून तू खूप काही बदलतोयस, सगळी बंधनं झुगारून देऊन तुझ्या मनातलं काहीतरी मांडतोयस...सहजपणे... ‘बघाच आणि समजून घ्याच’ असा आग्रह न करता ! या पिढीसाठीही आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी तू ‘प्रेरणा’ ठरणार आहेस. लब्यू भावा... असं किरण मानेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.