अभिनेता नव्हे, नेताच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2016 02:30 AM2016-03-12T02:30:13+5:302016-03-12T02:30:13+5:30
काल-परवापर्यंत अनुपम खेर यांची ओळख ही बॉलीवूडचा प्रतिभावंत अभिनेता अशी होती. परंतु आता ते पक्के नेता बनले आहेत. दिवसागणिक येणारी त्यांची विधाने नवनवीन वादाला जन्म घालीत आहेत.
- anuj.alankar@lokmat.com
काल-परवापर्यंत अनुपम खेर यांची ओळख ही बॉलीवूडचा प्रतिभावंत अभिनेता अशी होती. परंतु आता ते पक्के नेता बनले आहेत. दिवसागणिक येणारी त्यांची विधाने नवनवीन वादाला जन्म घालीत आहेत. नुकतेच ते कोलकात्यात गरजले. येथे ते राजकीय नेत्याच्या भूमिकेत, कें द्रीय सत्तेच्या विरोेधकांवर वार करीत होेते. जेव्हापासून केंद्रात नवे सरकार आले आहे, तेव्हापासून अनुपम खेर यांची लाइफ स्टाईल ३६० डिग्री टर्न झाली आहे. एकेकाळी अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे समर्थक राहिलेले अनुपम खेर हे या वेळी सत्ताधारी सरकारच्या कट्टर समर्थकांमध्ये आपली ओळख बनविण्यात यशस्वी झाले आहेत. या सरकारच्या बचावात अनुपम खेर यांनी सहिष्णुतेच्या मुद्द्यावरून दिल्लीत मोर्चा काढला. त्यांना लगेच पद्मश्री मिळाली. याच दरम्यान पाकिस्तानसाठी त्यांना व्हिसा न मिळाल्याचा मुद्दादेखील बरेच दिवस तापला. याच वादाच्या दरम्यान अनुपम खेर यांनी नंदिता दासला पाकिस्तानची प्रवक्ता संबोधले होते. कारण अनुपम खेर यांच्या तर्कासोबत ती सहमत नव्हती. सहिष्णुतेच्या मुद्द्यावरून ते शाहरूख खानच्या बचावात पुढे आले तर आमीर खानच्या विरोधात भूमिका घेतली. पुणे इन्स्टिट्यूटमध्ये गजेंद्र सिंहच्या नियुक्तीवरून ते कधी सरकारच्या पक्षात, तर कधी विद्यार्थ्यांच्या समर्थनात दिसले. अनुपम खेर यांचा भूतकाळ पाहिला तर ते नेहमी वादात राहिलेले दिसतील. काही वर्षांपूर्वी अनुपम खेर त्या वेळी वादात आले होते, जेव्हा एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्री ममता कुलकर्णीची बहीण मिथिलेशसोबत त्यांच्यावर छेडछाडीचा आरोप लावण्यात आला होता. यूपीए सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांना जेव्हा सेन्सॉर बोर्डच्या चेअरमन पदावरून हटविण्यात आले होते, त्याबद्दल त्यांनी डाव्या पक्षांना जबाबदार मानून सरकारवर टीका केली होती. अभिनेता इरफान खानसोबत त्यांचा एका चित्रपटावरून आमनासामना देखील झाला आहे. ‘गांधी टू हिटलर’ या चित्रपटाच्या वादावरूनदेखील अनुपम खेर चर्चेत राहिले होते. वाद हा होता की, अनुपम खेर यांनी आधी या चित्रपटात काम करण्यासाठी सहमती दर्शविली होेती आणि त्याबदल्यात अॅडव्हान्स ४ लाख रुपये घेतले होेते. नंतर त्यांनी या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आणि घेतलेले अॅडव्हान्स परतही केले नाही. विशाल भारद्वाजचा चित्रपट ‘हैदर’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा अनुपम यांनी विशाल भारद्वाजवर टीका केली होती.