‘ढाई किलो का हात’ वाचवू शकला नाही ५६ कोटींचा बंगला; २५ सप्टेंबरला ई-ऑक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 06:37 AM2023-08-21T06:37:41+5:302023-08-21T06:37:56+5:30

सनी देओलचा जुहू येथील बंगला लिलावात

Actor Sunny Deol could not save the 56 crore bungalow; E-auction on 25th September | ‘ढाई किलो का हात’ वाचवू शकला नाही ५६ कोटींचा बंगला; २५ सप्टेंबरला ई-ऑक्शन

‘ढाई किलो का हात’ वाचवू शकला नाही ५६ कोटींचा बंगला; २५ सप्टेंबरला ई-ऑक्शन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गदर-२ या सिनेमामुळे पुन्हा चर्चेत आलेला प्रसिद्ध अभिनेता सनी देओल याच्या जुहू येथील बंगल्याच्या लिलावाची प्रक्रिया बँक ऑफ बडोदाने सुरू केली असून या लिलावाच्या माध्यमातून बँक कर्ज आणि व्याजापोटी लागू असलेले ५६ कोटी रुपये वसूल करणार आहे. येत्या २५ सप्टेंबर रोजी ई-ऑक्शन पद्धतीने या मालमत्तेचा लिलाव होणार आहे. लिलावात इच्छुक असलेल्या लोकांना २२ सप्टेंबरपर्यंत अर्ज करावा लागणार आहे.

उपलब्ध माहितीनुसार, देशातील प्रमुख राष्ट्रीयीकृत बँक असलेल्या बँक ऑफ बडोदोने अभिनेता सनी देओल (मूळ नाव -अजय सिंग देओल) याला २०१६ मध्ये सिनेमा निर्मितीसाठी कर्ज दिले होते. या कर्जाकरिता त्याचा भाऊ व अभिनेता बॉबी देओल आणि त्याचे वडील व सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र आणि सनीची कंपनी सनी साउंड्स प्रा.लि. अशी तिघांनी या कर्जासाठी हमी दिली होती. तसेच, या कर्जासाठी सनी देओल याने जुहू येथील गांधीग्राम रोडवर असलेली सनी व्हिला हा आलिशान बंगला तारण म्हणून ठेवला होता. सुमारे ५९९ चौरस मीटर जागेवर हा बंगला आहे. सनी याने कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेने अनेक वेळा त्याला नोटिसा जारी केल्या होत्या. मात्र, त्या नोटिसींना कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. डिसेंबर २०२२ मध्ये हे कर्ज खाते थकीत कर्ज खाते म्हणून घोषित करण्यात आले. सनीच्या प्रकरणात बँकेने ५१ कोटी ४३ लाख ही राखीव किंमत निश्चित केली असून लिलावात सहभागी होणाऱ्या व्यक्ती वा कंपनीस ५ कोटी १४ लाख रुपये अमानत रक्कम म्हणून भरावी लागेल. तसेच, लिलावाची सुरुवात ही राखीव किमतीपेक्षा १० लाख रुपये अधिक रकमेने सुरू होणार आहे. दरम्यान, हे प्रकरण मिटवण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली असल्याची माहिती सनी देओल याच्या टीमने दिली आहे.

कसा आहे बंगला?

जुहूमधील आलिशान ठिकाणी हा बंगला असून या बंगल्यामध्ये आणखी दोन निर्मात्यांची कार्यालये आहेत. सनीचे कार्यालय आहे. तसेच, एक आलिशान साउंड स्टुडिओ आणि छोटेखानी चित्रपट थिएटर आहे. 

लिलावाला अडचण?

जुहूमध्ये जिथे हा बंगला आहे तेथील बरीचशी जमीन ही संरक्षण खात्याच्या अखत्यारीत असल्याचे समजते. त्यामुळे तेथे पुनर्विकास करण्यासाठी इच्छुक अनेक बंगल्यांसाठी ती प्रक्रिया सुलभ नाही. सनी देओल याचा बंगला देखील अशाच जमिनीशी निगडित असल्याचे समजते. त्यामुळे लिलावाला कसा प्रतिसाद मिळतो, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

बँकेच्या नियमानुसार...

     प्रलंबित कर्जासाठी बँकेतर्फे मुद्दल व व्याज भरण्यासाठी ९० दिवसांची मुदत दिली जाते. 
     ९० दिवसांत या कर्जाच्या रकमेचा भरणा झाला नाही तर संबंधित खाते हे बँकेतर्फे थकीत कर्ज खाते म्हणून घोषित केले जाते.
     त्यानंतर तातडीने या कर्जाच्या रकमेची वसुली करण्यासाठी जी मालमत्ता गहाण ठेवली जाते.
     मालमत्तेचा लिलाव करून बँक आपले पैसे वसूल करते. 

Web Title: Actor Sunny Deol could not save the 56 crore bungalow; E-auction on 25th September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.