ऐकत, पाहत ‘स्टार’ झालेला अभिनेता!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 07:08 AM2022-04-16T07:08:55+5:302022-04-16T07:09:09+5:30
स्वत:च्या गुणवत्तेच्या जोरावर ‘सुबोध भावे’ हे नाव उंचावत गेलं..
- सुधीर गाडगीळ, ख्यातनाम लेखक, संवादक
खरं तर भावे घराण्यात ‘खंडोबाची परंपरा’. पुण्यात सुबोध भावेंच्या घराण्याचं स्वत:चं खंडोबाचं देऊळ. एकिकडे धार्मिक पार्श्वभूमी तर दुसरीकडे उत्तम उच्चशिक्षण घेतलेला सुबोध एमकॉम ही मास्टर डिग्री घेऊन, बजाज ऑटो, शिवउद्योग, एल अॅण्ड टी, हरिका टेक्नॉलॉजी अशा नोकऱ्यांत रमलेला. मराठी मध्यमवर्गीय घरातला सुबोध रंगला मात्र नाटक, सिनेमा, मालिका, जाहिरात या प्रांतात. सध्या तर तो महिनाभर अमेरिकेत शहरोशहरी फक्त नाटकाचे प्रयोग करत भटकतोय.
वडिलांनी मात्र तो सहावीत असतानाच त्याला नाटकात काम करण्यासाठी प्रोत्साहीत केलं तर आईनं सुबोधला गाणं यावं अशी इच्छा बाळगली होती. उत्तम शिकून नोकऱ्या करता करता एका क्षणी त्याने नाटकात जायचं ठरवलं. उपेंद्र लिमयेंमुळे तो मालिकांच्या जगात आला. लोकमान्य टिळक, बालगंधर्व, औरंगजेब, काशिनाथ घाणेकर अशा व्यक्तिरेखा साकारत कलेच्या सर्व माध्यमात स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण केलेला तो लोकप्रिय स्टार ठरला.
‘सफर’ या दीर्घांकामुळे विजय तेंडुलकरांच्या सहवासात आला. त्यांचा उत्तम स्नेही बनला आणि ‘कुठलीही भूमिका साकारताना समोरच्याला नीट ऐका’ हा नाटकाचा महत्त्वपूर्ण धडा तो तेंडुलकरांकडून शिकला. नटाला कॉम्प्लेक्स यावा, इतकं उत्तम नाट्यवाचन ‘तें’ करत. त्यांचा तो श्रोताही बनला. पुढे भूमिकेतल्या ‘जागा’ शोधताना या श्रोतेपणाचा त्याला उपयोग झाला असावा. रवींद्र महाजनींच्या ‘सत्तेसाठी काहीही’मुळे मोठ्या पडद्याचा प्रथम अनुभव घेतला. ‘महाराष्ट्र संगीत रत्न’ या म्युझिकल शोमुळे निवेदनाच्या क्षेत्रात ‘नाव’ झालं. ‘कट्यार’ मूळ नाटक- सिनेमात निर्मिण्यापूर्वी, सुबोधने एकही संगीत नाटक पाहिलं नव्हतं, पण शंकर महादेवनला भीमसेनजींचा अभंग गाताना ऐकलं आणि त्याला ‘कट्यार’मध्ये स्थान देऊन, उत्तम अभिनेता गायक बनवण्याचं दिग्दर्शकीय कौशल्य दाखवलं.
कुठलीही पार्श्वभूमी नसताना, पाहता पाहता, ऐकता ऐकता ‘सुबोध’ स्टेजवर आणि कॅमेऱ्यासमोर येत गेला. शर्वरी, सोनाली, अमृता, मुक्ता या अभिनेत्रींबरोबर सूर जुळत गेले. नाटक-चित्रपट ते जाहिरातपट आणि गाणं यात नेमक्यावेळी उत्तम मार्गदर्शक मिळत गेले. त्यामुळे स्वत:च्या गुणवत्तेच्या जोरावर ‘सुबोध भावे’ हे नाव उंचावत गेलं..