"मी ब्राम्हण नाही, दलित नाही, तरीही..." अभिनेत्रीची 'फुले' सिनेमाविषयी पोस्ट चर्चेत, काय म्हणाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 18:55 IST2025-04-22T18:54:42+5:302025-04-22T18:55:17+5:30
सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अत्यंत मोजक्या आणि मार्मिक शब्दांमध्ये 'फुले' सिनेमाविषयी पोस्ट लिहिली आहे (phule)

"मी ब्राम्हण नाही, दलित नाही, तरीही..." अभिनेत्रीची 'फुले' सिनेमाविषयी पोस्ट चर्चेत, काय म्हणाली?
सध्या 'फुले' सिनेमाची (phule movie) चांगलीच चर्चा आहे. या सिनेमावर अनेक संघटनांनी विरोध केला. 'फुले' सिनेमा जातीभेदाला प्रोत्साहन देतोय, असेही आरोप सिनेमावर करण्यात आले. परिणामी सेन्सॉरने 'फुले' सिनेमावर काही बदल सुचवले. हे बदल करुन 'फुले' सिनेमा येत्या शुक्रवारी अर्थात २५ एप्रिलला रिलीज होतोय. 'फुले' सिनेमाविषयी अनुराग कश्यपने (anurag kashyap) पोस्ट लिहून त्याचं परखड मत व्यक्त केलं. अशातच मराठी अभिनेत्री आरती सोळंकीने (aarti solanki) मोजक्या तरीही स्पष्ट भाषेत पोस्ट लिहून 'फुले' सिनेमाबद्दल पोस्ट लिहिली आहे.
आरती सोळंकीची पोस्ट चर्चेत
अभिनेत्री आरती सोळंकी सध्या विविध विषयांवर तिचं स्पष्टपणे मत व्यक्त करत असते. आरतीने नवीन पोस्ट लिहिलीये. ज्यात ती सांगते की, "मी ब्राम्हण नाही, मी दलित नाही, मी मराठीसुद्धा नाही, माझा जन्म मुंबईमधला, माझं शिक्षण मराठीमधून, माझी कर्मभूमी तीही मराठी रंगभूमी, महाराष्ट्रामधल्या प्रत्येक महात्माबद्दल आदर, गर्व, अभिमान आहे, मी एक महाराष्ट्रीयन आहे आणि म्हणूनच फुले हा सिनेमा मी नक्की बघणार आहे."
अशाप्रकारे आरतीने 'फुले' सिनेमाला जाहीर पाठिंबा दिलाय. आपापसातले जातीभेद विसरुन 'फुले' सिनेमाला सपोर्ट करण्याचं आवाहन आरतीने केलंय. 'फुले' सिनेमा २५ एप्रिल २०२५ ला रिलीज होणार आहे. या सिनेमात प्रतीक गांधीने महात्मा फुलेंची भूमिका साकारली असून सावित्रीबाईंच्या भूमिकेत अभिनेत्री पत्रलेखा झळकणार आहे. अनंत महादेवन यांनी 'फुले' सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. सर्वांना या सिनेमाची उत्सुकता आहे.