‘या’ अभिनेत्रीने पत्रकाराला दिले सडेतोड उत्तर; व्हिडीओ व्हायरल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 05:01 PM2019-11-24T17:01:15+5:302019-11-24T17:03:48+5:30
रिअल लाईफमध्येही ती तेवढीच धाडसी असल्याचं कळतंय. नुकत्याच झालेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) तापसीने एका पत्रकाराने हिंदी भाषेत बोलायला सांगितले.
अभिनेत्री तापसी पन्नू हिला आपण विविध धाडसी भूमिका करताना पाहिलं आहे. ती जेवढ्या धडाडीच्या भूमिका करते तेवढंच परखडपणे बोलतेही. तिने के लेल्या ‘पिंक’, ‘बेबी’, ‘नाम शबाना’ या चित्रपटातून तिचा रोखठोकपणा प्रेक्षकांना दिसलाच. रिअल लाईफमध्येही ती तेवढीच धाडसी असल्याचं कळतंय. नुकत्याच झालेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) तापसीने एका पत्रकाराने हिंदी भाषेत बोलायला सांगितले. तेव्हा तापसीने दिलेलं उत्तर ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
"I am also an actress in the Tamil and Telugu industries. Shall I speak in Tamil to you?”
— Suvarna Haridas (@Suvarna_haridas) November 24, 2019
Watch @taapsee shuts down a man who asks her to speak in Hindi at 50th IFFI pic.twitter.com/QJuDI0DaTi
‘इफ्फी’त कलाकारांच्या चर्चासत्रादरम्यान एका पत्रकाराने तापसीला हिंदीत बोलण्याची विनंती केली. हे ऐकून तापसीने थेट उपस्थितांना प्रश्न विचारला की, ‘इथे हजर असलेल्या सर्वांना हिंदी भाषा कळते का?’ तिच्या या प्रश्नावर श्रोत्यांनी नकारार्थी उत्तर दिलं. त्यावर पत्रकाराने पुन्हा तिला म्हटलं, ‘तू हिंदी चित्रपटांत काम करतेस तर हिंदी बोलायला पाहिजे.’ यावर क्षणाचाही विलंब न करता तापसीने धडधडीत उत्तर दिलं, ‘मी दाक्षिणात्य अभिनेत्री सुद्धा आहे तर तेलुगू आणि तामिळ भाषेतही बोलू का?’ यावर सभागृहात एकच हशा पिकला.
या चर्चासत्रात तापसीने दाक्षिणात्य चित्रपटांचं महत्त्व तिच्या आयुष्यात कितपत आहे याविषयी सांगितलं. ‘दाक्षिणात्य चित्रपटांतून बॉलिवूडमध्ये येऊन क्वचितच कलाकार यशस्वी ठरतात आणि मला माझी सध्याची जागा सोडायची नाही. त्याचबरोबर मी दाक्षिणात्य चित्रपटांत काम करणं सोडणार नाही. ती इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय मूर्खपणाचा ठरेल. भविष्यात मी तिथे काम करत राहीन. तिथून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यामुळे त्यांच्याप्रती माझ्या मनात कृतज्ञतेची भावना आहे. मी दाक्षिणात्य इंडस्ट्रीचा वापर बॉलिवूडमध्ये येण्यासाठी कधीच नाही केला. त्यांनी मला खऱ्या अर्थाने लाइट, कॅमेरा काय असतं हे शिकवलं.’