बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीला 53 व्या वर्षी करायचे होते लग्न, पण एक अपघाताने बर्बाद झालं आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 02:48 PM2021-02-27T14:48:39+5:302021-02-27T15:15:05+5:30
सात वर्षांची असताना तिच्या वडिलांचे अकस्मात निधन झाले आणि घराची संपूर्ण जबाबदारी या अभिनेत्रीच्या खांद्यावर आली.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नंदा यांनी 2014मध्ये जगाचा निरोप घेतला. नंदा यांनी सुरुवातील बहिणीच्या आणि वहिनीच्या भूमिका स्वीकारल्या कारण त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले तेव्हा त्यांचे वय फक्त सहा वर्षे होते. पण ‘जब जब फुल खिले’ या सिनेमाने ही कोंडी फुटली आणि ‘जब जब फुल खिले’ हा सिनेमा नंदा यांच्या करिअरला कलाटणी देणारा ठरला. नंदा यांची गोष्ट खूपच इंटस्टेटिंग आहे.
नंदा यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. खरे तर नंदा यांना लष्करात जायचे होते. पण लतादीदींनी बालकलाकार म्हणून अभिनय थांबवल्यामुळे ऐनवेळी वडिलांनी नंदाला कॅमे-यापुढे उभे केले आणि तेथूनच बालकलाकार म्हणून ‘बेबी’ नंदाचा जन्म झाला. ‘बेबी’ नंदा सात वर्षांची असताना तिच्या वडिलांचे अकस्मात निधन झाले आणि घराची संपूर्ण जबाबदारी ‘बेबी’ नंदाच्या खांद्यावर आली आणि त्यांनी अभिनय करण्याचा निर्णय घेतला. 10 वर्षांच्या वयापर्यंत नंदा अभिनेत्री बनल्या. पण हिंदी सिनेमाच्या नाही तर मराठी सिनेमाच्या.
नंदा हिचे मावस काका व्ही. शांताराम यांच्या घरी एकदा लग्न होते. त्या समारंभात नंदा साडी घालून गेल्या, त्यांना पाहून व्ही. शांताराम यांनी त्यांना आपल्या पुढील चित्रपटात हिरोईन म्हणून घेणार असल्याचे सांगितले. हा चित्रपट होता ‘तुफान और दिया’ (१९५६). नंदा यांच्या आयुष्यातील हा पहिला हिंदी चित्रपट. यानंतर वेगवेगळ्या भूमिका करून नंदा यांनी कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलली. सगळ स्थिरस्थावर झाल्यावर नंदा यांनी विवाह करून स्वत:चा संसार थाटावा, असे तिच्या कुटुंबाला वाटत होते. पण नियतीला कदाचित हे मान्य नसावे.
नंदा दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्यावर प्रचंड प्रेम करायच्या. देसाई सुद्धा त्यांच्या प्रेमात होते. पण नंदा यांच्या लाजाळू स्वभावामुळे मनमोहन यांना आपले प्रेम व्यक्त करण्याची कधीच संधी मिळाली नाही. अखेर मनमोहन यांनी लग्न केले. मनमोहन यांच्या लग्नामुळे नंदा एकाकी पडल्या. पण कालांतराने मनमोहन यांच्या पत्नीचे निधन झाले आणि नंदाच्या आयुष्यात पुन्हा एकदा त्यांचे प्रेम परतले. अर्थात तोपर्यंत नंदा यांनी वयाची पन्नाशी गाठली होती. मनमोहन यांच्या नंदा यांच्यापुढे आपल्या प्रेमाची कबुली दिली. 1992 मध्ये वयाच्या 53 व्या वर्षी नंदा यांनी मनमोहन देसाई यांच्यासोबत साखरपुडा केला. साखरपुड्यानंतरही दोन वर्षे नंदा व देसाई यांचे लग्न होऊ शकले नाही आणि एकदिवस एका अपघातात देसाई यांच्या मृत्यूचीच बातमी नंदा यांना मिळाली. नंदा हा अपघात पचवू शकल्या नाही. त्यानंतर त्या आयुष्यभर अविवाहितच राहिल्या.