विनेश फोगटच्या विजयानंतर कंगनाची पोस्ट चर्चेत; म्हणाली, "मोदींविरोधात घोषणा दिल्या तरी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 10:34 AM2024-08-07T10:34:36+5:302024-08-07T10:39:44+5:30

Vinesh Phogat : पॅरिस ऑलिम्पिकमधील विनेश फोगटच्या ऐतिहासिक विजयानंतर अभिनेत्री-राजकारणी कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे

Actress-politician Kangana Ranaut reacts after Vinesh Phogat historic win at Paris Olympics 2024 | विनेश फोगटच्या विजयानंतर कंगनाची पोस्ट चर्चेत; म्हणाली, "मोदींविरोधात घोषणा दिल्या तरी..."

विनेश फोगटच्या विजयानंतर कंगनाची पोस्ट चर्चेत; म्हणाली, "मोदींविरोधात घोषणा दिल्या तरी..."

Kangana Ranaut on Vinesh Phogat Historic Win : भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने इतिहास रचला आहे. विनेश फोगटनेपॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतासाठी रौप्य पदक निश्चित केले आहे. विनेशने महिलांच्या ५० किलो फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ऑलिम्पिक इतिहासात महिला कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहोचणारी विनेश ही पहिली भारतीय महिला कुस्तीपटूही ठरली आहे. त्यामुळे देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र हीच विनेश फोगट वर्षभरापूर्वी दिल्लीत लैगिंक छळाच्या विरोधात आंदोलन करत होती. दुसरीकडे आता खासदार कंगना रणौतने विनेशचे अभिनंदन करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारमुळेच तिला ऑलिम्पिक खेळण्याची संधी मिळाल्याचे म्हटलं आहे.

विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरू शकणार आहे. विनेश फोगटने ५० किलो फ्रीस्टाइल कुस्तीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय महिला कुस्तीपटूने फायनलमध्ये प्रवेश केल्याने विनेशचे कौतुक केले जात आहे. आता विनेश फोगटला भारताची पहिली ऑलिम्पिक चॅम्पियन कुस्तीपटू बनण्याची संधी आहे. अंतिम फेरीत विनेशला सुवर्ण पदक जिंकण्याची संधी आहे. त्यामुळे भारतीय लोक विनेशकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा लावून बसले आहेत. हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदारसंघातील खासदार कंगना रणौतनेही इन्स्टाग्राम स्टोरी ठेवत विनेशला शुभेच्छा दिल्या आहेत. भारताला पहिलं गोल्ड मिळेल यासाठी प्रार्थना करते, असं कंगनाने म्हटलं आहे.

"भारताच्या पहिल्या सुवर्णपदकासाठी प्रार्थना करते. विनेश फोगटने एका वेळी आंदोलनात भाग घेतला जिथे तिने 'मोदी तेरी कबर खुदेगी' अशा घोषणा दिल्या होत्या. तरीही तिला देशाचे प्रतिनिधित्व करण्याची आणि सर्वोत्तम प्रशिक्षण, प्रशिक्षक आणि चांगल्या सुविधा मिळण्याची संधी देण्यात आली . हे लोकशाहीचे सौंदर्य आणि महान नेत्याची पोचपावती आहे," असं कंगनाने तिच्या इन्स्टा पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि माजी ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक यांनी गेल्या वर्षी  भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन केले होते. ब्रिजभूषण शरण सिंह यांनी केलेल्या महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या विरोधात दिल्लीत तिघांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु होते.
 

Web Title: Actress-politician Kangana Ranaut reacts after Vinesh Phogat historic win at Paris Olympics 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.