"मला विचारा, एक एक डायलॉग...", कपिल शर्माने KBC चा उल्लेख करताच रेखाची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 09:23 AM2024-12-02T09:23:52+5:302024-12-02T09:24:46+5:30
अमिताभ बच्चन यांच्या KBC चा उल्लेख होताच रेखा यांची रिअॅक्शन व्हायरल
बॉलिवूडमध्ये अनेक जोड्यांचं नाव घेतलं जातं त्यातच अमिताभ-रेखा (Amitabh - Rekha) या नावाची खूप चर्चा होते. 'अधुरी प्रेम कहाणी' असं यांचं नातं. अमिताभ यांनी कधीच रेखावरचं प्रेम सर्वांसमोर व्यक्त केलं नाही. मात्र रेखा अनेकदा नॅशनल टेलिव्हिजनवर बिग बींविषयी बोलल्या आहेत. नुकतंच कपिल शर्माने (Kapil Sharma) शोमध्ये केबीसी मधील अमिताभ बच्चन यांची मिमिक्री केली. यावर रेखाची प्रतिक्रिया पाहून सर्वांनाच हसू आलं. काय म्हणाल्या रेखा?
'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो' मध्ये यावेळी सदाबहार अभिनेत्री रेखा हजेरी लावणार आहे. तरुणींनाही लाजवेल असं ज्यांचं सौंदर्य आणि फॅशन बाबतीतही सर्वांना मात देणारी ही अभिनेत्री शोमध्ये आली आहे. यावेळी कपिल रेखासमोर त्याचा केबीसी मधला अनुभव शेअर करतो. तो म्हणतो, 'मी बच्चन सरांसमोर केबीसी खेळत होतो. माझी आईही तिथे होती. सरांनी माझ्या आईला विचारलं, 'देवी जी क्या खाके पैदा किया?' कपिल याचं उत्तर देणार तेवढ्यात रेखा म्हणते, 'दाल रोटी'. रेखाने बरोबर उत्तर दिलं हे पाहून कपिलही शॉक होतो. तेव्हा रेखा म्हणते,'मला विचारा...एक एक डायलॉग लक्षात आहे.'
कपिल शर्मा शो मधील हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. तसंच रेखा म्हणतात, 'मी ७० वर्षांची झाले आहे. ऐकलं का तुम्ही १७ वर्षांची झाले आहे.' रेखा यांचा चार्म पाहून सगळेच घायाळ होतात. यानंतर कृष्णा अभिषेक अमिताभ बच्चन यांचा गेटअप करुन येतो. त्याच्यासोबत रेखा डान्सही करतात.