‘भूमिकांमधील आव्हान शोधते’- अभिनेत्री संगीता घोष
By अबोली कुलकर्णी | Published: March 29, 2019 07:31 PM2019-03-29T19:31:06+5:302019-03-29T19:32:13+5:30
वेगवेगळया व्यक्तिरेखा जगायला लावणारं असं कलाकारांचं आयुष्य असतं. कलाकाराला जी भूमिका मिळेल त्यातून त्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं, असे मत स्टार प्लस वाहिनीवरील ‘दिव्यदृष्टी’ मालिकेत पिशाच्चिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री संगीता घोष हिने सांगितले.
अबोली कुलकर्णी
वेगवेगळया व्यक्तिरेखा जगायला लावणारं असं कलाकारांचं आयुष्य असतं. कलाकाराला जी भूमिका मिळेल त्यातून त्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं, असे मत स्टार प्लस वाहिनीवरील ‘दिव्यदृष्टी’ मालिकेत पिशाच्चिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री संगीता घोष हिने सांगितले. या मालिकेबाबत आणि आत्तापर्यंतच्या वाटचालीबद्दल तिने गप्पा मारल्या.
* ‘दिव्यदृष्टी’ या मालिकेत तू पिशाच्चिनीच्या भूमिकेत दिसत आहेस. काय सांगशील कशी तयारी केलीस?
- मी ‘दिव्यदृष्टी’ या मालिकेत एका पिशाच्चिनीच्या भूमिकेत दिसत आहे. ही भूमिका जेव्हा मला ऑफर झाली तेव्हा मला काहीतरी वेगळं आणि नवीन करायला मिळणार, एवढंच मला लक्षात आलं. खरंतर मला आव्हानात्मक आणि हटके भूमिका करायला नेहमीच आवडतं. त्याचप्रमाणे ही भूमिकाही माझ्यासाठी तितकीच वेगळी आहे. मी माझी ही भूमिका खूप एन्जॉय करते आहे. तयारी अशी काही केली नाही. पण, होय मी नक्कीच दररोज नवीन काहीतरी शिकते.
* मालिकेच्या टीमसोबत तुझं बाँण्डिंग कसं आहे? काय सांगशील?
- खुप छान. कारण आता जेव्हापासून आम्ही चित्रीकरण सुरू केलं, तेव्हापासून आमच्या रोज भेटी होतात. त्यामुळे सेटवर रोज नवीन काहीतरी घडत असतं. प्रत्येक जण रोज तेवढ्याच एनर्जीने सेटवर येतो. आम्ही सेटवर खूप धम्माल, मस्ती करतो. त्यामुळे आमच्यात खूप चांगलं बाँण्डिंग निर्माण झाली आहे. आम्ही एकत्र गप्पा मारतो, जेवतो आणि एकमेकांच्या अनुभवांचं शेअरिंगही करतो.
* अभिनेत्री, मॉडेल, होस्ट, डान्सर म्हणून तुला आत्तापर्यंत आम्ही पाहिले आहे. कसा होता आत्तापर्यंतचा प्रवास?
- नक्कीच खूप शिकवणारा होता. खरंतर मी कधीही भूतकाळातल्या चुका आठवत बसत नाही, म्हणजे मला ते आवडतच नाही. मी कायम पुढे चालत राहणारी व्यक्ती आहे. मी माझं काम किती चांगल्याप्रकारे विकसित करू शकते यावरच खरंतर माझं संपूर्ण लक्ष असतं. आत्तापर्यंतच्या प्रवासानं मला खूप समृद्ध केलं. एक चांगली अभिनेत्री बनण्याबरोबरच मी एक चांगली व्यक्ती म्हणून घडत गेले. मला वाटतं, आजच्या जगात तेच जास्त महत्त्वाचं आहे.
* १९८७ या वर्षापासून तू इंडस्ट्रीत काम करत आहेस. किती बदल झाला आहे असे वाटते?
- प्रचंड बदल झाला आहे. तांत्रिक आणि मालिकेच्या स्क्रिप्टच्या बाबतीत बघितलं तर नवनवीन प्रयोग होताना दिसत आहेत. त्यामुळे काम करणं तितकंच आव्हानात्मक होत आहे. पण, मजा येते जेव्हाही असे नवीन प्रयोग होतात आणि आपण त्यांचा भाग असतो.
* चित्रीकरणामुळे तुझे शेड्यूल खुपच व्यस्त असेल. मग स्वत:ला वेळ कसा काढतेस?
- खरं सांगायचं तर, आज असं कुणीही नाही ज्याच्याकडे खूप फ्री टाईम आहे. आम्ही कलाकार मंडळी तरी कशा त्याच्यातून सुटणार? आम्हालाही वेळ मिळत नाही, काढावा लागतो. पण, जेव्हाही असा फ्री टाइम मला मिळतो तेव्हा मी स्वत:साठी वेळ देते. माझ्या आवडीनिवडी जोपासते.