Victoria Movie Review: व्हिक्टोरियातील अघटीत घटनांचा थरार; सोनाली कुलकर्णींच्या 'व्हिक्टोरिया' रिव्ह्यू

By संजय घावरे | Published: January 13, 2023 07:20 PM2023-01-13T19:20:35+5:302023-01-13T19:30:28+5:30

हॅारर मिस्ट्री थ्रिलर असलेला सोनाली कुलकर्णीच्या व्हिक्टोरिया सिनेमाचे दिग्दर्शन विराजस कुलकर्णी केलं आहे. जाणून घ्या कसा आहे हा सिनेमा.

Actress Sonalee kulkarni Victoria Marathi Movie Review | Victoria Movie Review: व्हिक्टोरियातील अघटीत घटनांचा थरार; सोनाली कुलकर्णींच्या 'व्हिक्टोरिया' रिव्ह्यू

Victoria Movie Review: व्हिक्टोरियातील अघटीत घटनांचा थरार; सोनाली कुलकर्णींच्या 'व्हिक्टोरिया' रिव्ह्यू

googlenewsNext

कलाकार : सोनाली कुलकर्णी, आशय कुलकर्णी, पुष्कर जोग
दिग्दर्शक : विराजस कुलकर्णी, जीत अशोक
निर्माते : आनंद पंडीत, रुपा पंडीत, पुष्कर जोग
शैली : हॅारर मिस्ट्री थ्रिलर
कालावधी : एक तास ४९ मिनिटे
दर्जा : अडीच स्टार 
चित्रपट परीक्षण : संजय घावरे

लेखन आणि अभिनयानंतर दिग्दर्शनाकडे वळलेला विराजस कुलकर्णी आणि त्याचा मित्र जीत आकाश यांनी पदार्पणातच हॅारर मिस्ट्री थ्रिलर हा काहीसा आव्हानात्मक जॅानर हाताळला आहे. चित्रपटाची कथा स्कॅाटलंडमध्ये घडत असून, तिथे घडलेल्या मिस्ट्रीचा थरारक शैलीत पर्दाफाश करण्याचं काम दिग्दर्शक द्वयींनी केलं आहे. त्यांना मिळालेली कलाकारांची उत्तम साथ हे या चित्रपटाचं सर्वात मोठं वैशिष्टय आहे.

कथानक : चित्रपटाची कथा अंकिता आणि सिद्धार्थ या जोडप्याभोवती गुंफण्यात आली आहे. सिद्धार्थच्या वडिलांच्या सांगण्यावरून दोघंही आराम करण्यासाठी स्कॅाटलंडमध्ये आपल्या अधिराज काकांच्या घरी येतात. अधिराज दोघांना घेऊन बऱ्याच दिवसांपासून बंद असलेल्या व्हिक्टोरीया हॅाटेलवर जातो. तिथे तो एकटाच रहात असतो. हॅाटेलमध्ये पोहोचल्यावर अंकिताला तिथे कोणते तरी भास होऊ लागतात. सिद्धार्थ त्याकडे दुर्लक्ष करतो, पण अंकीताचं मन काही मानायला तयार नसतं. त्या रहस्याचा शोध घेत ती हॅाटेलमधील निर्बंधीत क्षेत्रात जाते. त्यानंतर काय घडतं ते चित्रपटात आहे.

लेखन-दिग्दर्शन : मिस्ट्री असल्यानं अखेरच्या क्षणापर्यंत रहस्य उलगडू न देण्याचं काम विराजसनं पटकथेत केलं आहे. कित्येकदा संभ्रमात टाकणारे आणि पुढे नेमकं काय घडणार आहे याचा थांगपत्ता न लागू देणारे संवाद यात आहेत. चित्रपटाची गती सुरुवातीपासूनच काहीशी मंद वाटते. नायिकेला असलेल्या आजारामुळे आराम करण्यासाठी नायकासोबत तिचं स्कॅाटलंडला येणं यामुळे हा चित्रपट म्हणजे काहीशी शॅाकींग ट्रीटमेंट असण्याशी शक्यता वाटते, पण क्लायमॅक्समध्ये काहीसं वेगळं आणि आश्चर्यकारक चित्र पहायला मिळतं. सुरेख कॅमेरावर्क आणि नेहमीपेक्षा वेगळं पार्श्वसंगीत यात आहे. चित्रपटात मुख्य कॅरेक्टरखेरीज कोणी नसले तरी संपूर्ण स्कॅाटलंड शहरात, तिथल्या रस्त्यांवर लॅाकडाऊनसदृश परिस्थिती का भासवण्यात आली ते समजत नाही. क्लायमॅक्समध्ये नायिकेला अंर्तज्ञानानं सर्व काही समजतं आणि ती खलनायकासमोर त्याच्या कृत्याचा संपूर्ण पाढा दिव्यदृष्टी प्राप्त झाल्याप्रमाणे वाचून दाखवते हे पचवणं थोडं जड जातं. हॅाटेलमध्ये एकही माणूस कामाला नसूनही अधिराजचं स्टाफबाबत सांगणं खटकतं. दिग्दर्शनात काही उणीवा राहिल्या असल्या तरी विराजस आणि जीतचा पदार्पणातील प्रयत्न चांगला झाला आहे. तांत्रिकदृष्टया चित्रपट सक्षम आहे.

अभिनय : या चित्रपटात एक वेगळीच सोनाली कुलकर्णी पहायला मिळते. अंकीताची भूमिका तिनं खूप मेहनतीनं साकारली आहे. आशय कुलकर्णीचं कॅरेक्टर थोडं बिनधास्त असून, त्यानं त्याच शैलीत ते साकारलं आहे. पुष्कर जोगचं एक वेगळं रूप या चित्रपटात पहायला मिळतं. अभिनयाच्या दृष्टिकोनातून काहीसा परिपक्व होत असलेल्या पुष्कर यात दिसतो. सर्वच कलाकारांनी चांगलं काम केलं आहे. 

सकारात्मक बाजू : पटकथा, संवाद, अभिनय, दिग्दर्शन, सिनॅटोग्राफी, लोकेशन्स
नकारात्मक बाजू : क्लायमॅक्समधील काही उणीवा, सिनेमाची मंदावलेली गती
थोडक्यात : पदार्पणात दोन नवोदित दिग्दर्शकांनी प्रेक्षकांना थरारक अनुभव देण्याचा चांगला प्रयत्न केला असल्याने उणीवांकडे दुर्लक्ष करून हा चित्रपट एकदा पहायला हवा.
 

Web Title: Actress Sonalee kulkarni Victoria Marathi Movie Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.