"ज्युलियाने हट्ट केला अन्.."; लेकीच्या कॉलेज अॅडमिशनवेळी सुकन्या मोनेंना आला स्वामींचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 12:13 PM2024-06-04T12:13:19+5:302024-06-04T12:15:34+5:30
सुकन्या मोनेंनी लेकीच्या अॅडमिशनवेळी त्यांना स्वामी समर्थांची प्रचिती कशी आली, याचा विलक्षण अनुभव सांगितला आहे. (sukanya mone, shree swami samartha)
अभिनेत्री सुकन्या मोने या मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. सुकन्या मोनेंना आपण विविध माध्यमांत अभिनय करताना पाहिलंय. गेल्या वर्षी २०२३ ला 'बाईपण भारी देवा' या सुपरहिट सिनेमात सुकन्या मोनेंनी साकारलेली भूमिका चांगलीच गाजली. काहीच दिवसांपुर्वी प्रदर्शित झालेल्या 'नाच गं घुमा' सिनेमातही सुकन्या यांनी साकारलेली छोटीशी भूमिका सर्वांच्या पसंतीस उतरली. सुकन्या मोनेंची स्वामी समर्थांवर श्रद्धा आहे. त्याचाच आलेला अनुभव त्यांनी एका मुलाखतीत सांगितला.
सुकन्या मोनेंना आली स्वामी प्रचिती
रेडीओ मिर्चीला दिलेल्या मुलाखतीत सुकन्या मोनेंनी त्यांना स्वामींची प्रचिती कशी आली, याचा अनुभव सांगितला आहे. सुकन्या मोनेंची लेक ज्युलियाच्या कॉलेज अॅडमिशनवेळी आलेला अनुभव त्यांनी उलगडला. सुकन्या आणि त्यांचे पती संजय मोने लेकीला रुईया कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला सांगत होते. रुईया त्यांच्या घरापासून जवळ होतं आणि त्यांच्या ओळखीही होत्या. परंतु ज्युलियाला सोफय्या कॉलेजमध्ये जाऊन काहीतरी नवीन explore करायचं होतं.
स्वामींकडे सुकन्या मोनेंनी केली प्रार्थना
अॅडमिशन कुठे घ्यायचं हा प्रश्न होता. अखेर संजय मोनेंनी पावणेतीन वाजता ज्युलियाला सोफय्या कॉलेजमध्ये अॅडमिशन घेण्याची परवानगी दिली. ३ वाजता अॅडमिशन काऊंटर बंद होणार होतं. त्यामुळे १५ मिनिटांत सोफय्या कॉलेजला पोहोचणं निव्वळ अशक्य होतं. तरीही सुकन्या यांना आशा होती. त्यांनी जायच्या आधी स्वामींकडे प्रार्थना केली. "पहिल्यांदा माझ्या लेकीने हट्ट केलाय. मला माहित नाही तुम्ही तो पूर्ण करा.", अशी प्रार्थना सुकन्या यांनी स्वामी समर्थांजवळ केली.
धावत धावत अॅडमिशन घ्यायला पोहोचले अन्..
शेवटी ड्रायव्हरला सांगून सुकन्या लेकीसोबत सोफय्या कॉलेजला गेल्या. प्रवासात त्यांचा जप चालू होता. ज्युलिया १० रुपयांचा अॅडमिशन फॉर्म घेऊन पुढे गेली. सुकन्या लेकीच्या मागे थावत धावत गेल्या. पण वरुन ज्युलिया म्हणाली, "आरामात या. सर्व्हर बंद झालंय". ३.२६ ला सुकन्या लेकीसोबत सोफय्या कॉलेजला होत्या. पावणेचार दरम्यान सर्व्हर चालू झालं आणि ज्युलियाचं अॅडमिशन झालं. 'स्वामी तिच्यासोबत कायम आहेत', अशा शब्दात सुकन्या मोनेंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.