'ही' अभिनेत्री साकारणार राकेश मारिया यांच्या पत्नीची भूमिका, जॉन अब्राहमसोबत झळकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 12:49 IST2025-04-21T12:48:49+5:302025-04-21T12:49:01+5:30
राकेश मारिया यांच्या बायोपिकमध्ये त्यांच्या पत्नीची भूमिका कोण साकारणार (rakesh maria)

'ही' अभिनेत्री साकारणार राकेश मारिया यांच्या पत्नीची भूमिका, जॉन अब्राहमसोबत झळकणार
बॉलिवूडचे 'सिंघम' दिग्दर्शक अशी ओळख असणारे रोहित शेट्टी (rohit shetty) त्याच्या आजवरच्या सिनेमांपेक्षा प्रथमच एक वेगळा सिनेमा करणार आहे. रोहित शेट्टी पहिल्यांदाच एका बायोपिकचं दिग्दर्शन करणार आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या जीवनावर आधारित बायोपिक तयार करण्यासाठी रोहित उत्सुक आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम (john abraham) मुख्य भूमिकेत असून, तो राकेश मारिया (rakesh maria biopic) यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात राकेश मारिया यांची पत्नी प्रीती मारिया यांची भूमिका कोण साकारणार, याविषयी चाहत्यांना उत्सुकता होती. अखेर त्याचा खुलासा झाला आहे.
ही अभिनेत्री साकारणार राकेश मारियांच्या पत्नीची भूमिका
राकेश मारिया यांची पत्नी प्रीती मारिया यांच्या भूमिकेत अभिनेत्री तमन्ना भाटिया दिसणार आहे. तमन्नाने यापूर्वी जॉन अब्राहमसोबत 'वेदा' या चित्रपटात काम केले आहे. या बायोपिकमध्ये तमन्नाची भूमिका अत्यंक भावनिक असणार आहे. राकेश मारिया यांच्या आयुष्यातील कठीण काळात त्यांच्या पाठीशी त्यांची पत्नी प्रीती मारिया खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यामुळे प्रीती मारिया यांची भूमिका साकारणं ही तमन्नाच्या आजवरच्या करिअरमधील आव्हानात्मक भूमिका आहे.
राकेश मारिया यांच्या बायोपिकविषयी
रोहित शेट्टी यांचा हा बायोपिक राकेश मारिया यांचं आत्मचरित्र 'लेट मी से इट नाऊ' या पुस्तकावर आधारित असून, मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोट, 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यांसारख्या घटनांमध्ये त्यांनी बजावलेल्या भूमिकेवर या आत्मचरित्रात प्रकाश टाकला गेलाय. रोहित शेट्टी दिग्दर्शित हा पहिला बायोपिक आहे. रोहित शेट्टींनी सिंघम, सिंबा, सूर्यवंशी यांसारख्या सिनेमांतून कॉप युनिव्हर्सची आगळीवेगळी निर्मिती केली. राकेश मारिया यांच्या बायोपिकच्या माध्यमातून रोहित शेट्टी करिअरमध्ये प्रथमच एक वेगळा प्रयत्न करताना दिसणार आहेत. या सिनेमाच्या शूटिंगला मुंबईत सुरुवात झाली आहे.