ऍडगुरु भरत दाभोळकर यांनीदेखील आमिरच्या 'त्या' जाहिरातीवर व्यक्त केली नाराजी; सविस्तर वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 02:52 PM2022-10-15T14:52:48+5:302022-10-15T14:54:04+5:30
'बँकेची जाहिरात कमी, रूढी बदलण्यावर अकारण भर जास्त', याला जाहिरात म्हणत नाहीत, भरत दाभोळकर काय म्हणाले जाणून घ्या!
अलीकडेच एका छोट्याशा बँकांच्या जाहिरातीने नव्या वादाला तोंड फोडले आहे. आमिर खान आणि कियारा अडवाणी या दोन महागड्या कलाकारांना घेऊन जाहिरात करायची गरजच नव्हती आणि करायचीच होती तर बँकेच्या जाहिरातीवर जास्त भर द्यायला हवा होता असे म्हणत ऍडगुरु भरत दाभोळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आमिर आणि कियारा यांच्या जाहिरातीत हिंदू धर्मातील नववधूचे सासरी माप ओलांडणे रूढीवादी ठरवून जावयाचा गृहप्रवेश दाखवण्यात आला आहे. नवीन प्रथा पाडूयात, असे म्हणत हिंदू प्रथांमध्ये अकारण हस्तक्षेप केला आहे. बँकेच्या जाहिरातीचा आणि या प्रसंगाचा दुरान्वये संबंध नसून केवळ चर्चेत येण्याच्या दृष्टीने ही जाहिरात केल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे भारतात असुरक्षित वाटते, असे म्हणणाऱ्या मिस्टर परफेक्शनिस्ट आमिरवर टीकेची झोड उठवली जात आहे.
हिंदूंच्या प्रथा परंपरांमध्ये हस्तक्षेप करताना आमिरचा पुढाकार दिसतो आणि स्वतःच्या मजहबबाबतीत तो चुप्पी साधतो यावरून त्याचा दुटप्पीपणाचा लोकांना अतिशय राग आहे. दर वेळेस हिंदू धर्माला सॉफ्ट कॉर्नर समजून टार्गेट करण्यापेक्षा त्याने या विषयांपासून दूर राहावे अशी प्रतिक्रिया जनसामान्यांमधून उठत आहे. एवढेच काय तर जाहिरात क्षेत्रात वर्षानुवर्षे काम केलेले ऍडगुरु भरत दाभोळकर हेदेखील जाहीरपणे या जाहिरातीवर नाराजी व्यक्त करताना दिसते. ते एका व्हिडीओमध्ये म्हणतात, -
'अवघ्या ६० सेकंदात तुम्हाला तुमच्या वस्तूची, व्यक्तीची, कंपनीची जाहिरात करायची असताना, विषयाची मांडणी त्यांच्या अनुषंगाने होणे अपेक्षित असते. ज्यामुळे प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत आपण कसे श्रेष्ठ हे पटवून दिले पाहिजे. सदर जाहिरातीत मुख्यत्त्वे आमिर आणि कियारा यांच्यावर एवढे पैसे खर्च करणे हाच बँकेचा चुकीचा निर्णय होता. अशात आमिरने ४० सेकंद बँकेबद्दल आणि २० सेकंद कियारा आणि आमिरवर चित्रित झालेली दाखवायला हवी होती. त्या सृजनत्त्व, कौशल्य कुठेच दिसून येत नाही. मात्र तसे न होता विषयाला फाटा फोडून अमुक एक धर्माबद्दल, त्यांच्या प्रथा परंपरांबद्दल भाष्य करणे आणि वाद ओढवून घेणे याला जाहिरात म्हणत नाहीत. तसे करणे मूर्खपणाचे आहे.'