दुष्काळी गावातील तरुणाच्या जिद्दीची प्रेरणादायी गोष्ट, एकदा पाहायलाच हवा 'पाणी' सिनेमा

By संजय घावरे | Published: October 18, 2024 02:47 PM2024-10-18T14:47:02+5:302024-10-18T14:47:55+5:30

मैलो न मैल पायपीट करून स्त्रियांना पाणी आणावं लागतं. अशाच एका गावातील खरीखुरी कथा दिग्दर्शक आदिनाथ कोठारेने या चित्रपटात सादर केली आहे.

adinath kothare paani marathi movie review inspiration story of hanumant kendre | दुष्काळी गावातील तरुणाच्या जिद्दीची प्रेरणादायी गोष्ट, एकदा पाहायलाच हवा 'पाणी' सिनेमा

दुष्काळी गावातील तरुणाच्या जिद्दीची प्रेरणादायी गोष्ट, एकदा पाहायलाच हवा 'पाणी' सिनेमा

Release Date: October 18,2024Language: मराठी
Cast: आदिनाथ कोठारे, रुचा वैद्य, सुबोध भावे, किशोर कदम, गिरीश जोशी, रजित कपूर, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी. श्रीपाद जोशी, विकास पाटील
Producer: नेहा बडजात्या, रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनास, डॉ. मधू चोप्राDirector: आदिनाथ कोठारे
Duration: २ तास ३ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

महाराष्ट्राच्या काही भागात आजही पाण्याचं दुर्भिक्ष्य आहे. मैलो न मैल पायपीट करून स्त्रियांना पाणी आणावं लागतं. अशाच एका गावातील खरीखुरी कथा दिग्दर्शक आदिनाथ कोठारेने या चित्रपटात सादर केली आहे. वास्तवदर्शी कथेला पूरक असलेला सहजसुंदर अभिनय आणि त्यासाठी घेतलेले अपार कष्ट चित्रपट पाहताना जाणवतात.

कथानक : नांदेडमधील नागदरेवाडी गावातील हनुमंत केंद्रे उर्फ बाबूची ही गोष्ट आहे. बाबू लग्नासाठी मुलगी पाहायला जातो. सुवर्णाला पाहताच तो लग्नासाठी होकार देतो. सुवर्णाही बाबूला पसंत करते, पण नागदरेवाडीमध्ये पाणी नसल्याने तिचे वडील बाबूसोबत लग्नाला नकार देतात. बाबूला कोणत्याही परिस्थितीत सुवर्णाशीच लग्न करायचं असतं. त्यासाठी तो गावात पाणी आणण्याचा निर्धार करतो. सरकार दरबारी असलेला बाबूचा भाऊ बालाजी त्याला प्रशासकीय पातळीवर मदत करतो. पुढे गावकऱ्यांना एकत्र आणून पाण्यासाठी काम करणाऱ्या बाबूचा संघर्ष आहे.

लेखन-दिग्दर्शन : हि खरी स्टोरी असल्याने मनोरंजक मूल्यांचा आवश्यकतेनुसारच वापर करण्यात आलेला आहे. पटकथेमध्ये प्रेमकथा गुंफताना कुठेही मूळ गाभ्याला धक्का बसणार नाही याची काळजी घेतली आहे. दोन्हींचा समतोल राखण्यात आला आहे. नांदेडमधील बोलीभाषेसाठी खूप मेहनत घेतली आहे. रिअल लोकेशन्स प्रसंगांमधील भीषण वास्तव अधिक गडद करतात. रात्री बाईकवरून जाण्याचा सीन, खड्डे बुजविणाऱ्यांना अद्दल घडवण्याचा प्रसंग, विहिर खोदण्याची दृश्ये, गावकऱ्यांना एकत्र आणण्यासाठी घेतलेली मेहनत प्रेरणादायी ठरणारी आहे. वेशभूषा आणि वातावरण निर्मितीकडे विशेष लक्ष दिलं आहे. गीत-संगीतही चांगलं आहे, गतीकडे थोडं लक्ष देण्याची गरज होती.

अभिनय : सर्वच कलाकारांचा सहजसुंदर अभिनय ही या चित्रपटाची मोठी जमेची बाजू आहे. बाबू साकारण्यासाठी बोलीभाषेपासून, देहबोलीपर्यंत प्रत्येक गोष्टीवर मेहनत घेतल्याने यात कुठेही आदिनाथ कोठारे दिसत नाही. सुवर्णाच्या भूमिकेत नवोदित रुचा वैद्यची त्याला सुरेख साथ लाभली आहे. सुबोध भावेने साकारलेला थोरला भाऊ, किशोर कदमच्या रूपातील सरपंच, शासकीय अधिकारी बनलेले रजित कपूर यांच्यासह गावकऱ्यांच्या भूमिकेतील सर्व कलाकारांनी आपापल्या भूमिका चोख बजावल्या आहेत.

सकारात्मक बाजू : कथा, पटकथा, संवाद, बोलीभाषा, अभिनय, दिग्दर्शन, कला दिग्दर्शन, वातावरण निर्मिती, गीत-संगीत
नकारात्मक बाजू : गती, मसालापटांच्या चाहत्यांना आवडणार नाही
थोडक्यात काय तर एकीकडे शहरामध्ये पाण्याचा अपव्यय केला जातो, तर गावांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. हृदयाला भिडणारं हे वास्तव पाहण्यासाठी हा चित्रपट प्रत्येकाने बघायला हवा.

Web Title: adinath kothare paani marathi movie review inspiration story of hanumant kendre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.