सकाळी उठलो आणि नळाला पाणीच नव्हतं! मराठवाड्यात सिनेमाच्या शूटिंगदरम्यानही 'पाणीबाणी', आदिनाथने सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 02:44 PM2024-10-16T14:44:26+5:302024-10-16T14:44:56+5:30

'पाणी' सिनेमाचं शूटिंग मराठवाड्यातील एका गावात करण्यात आलं आहे. शूटिंग करतानाही आदिनाथ आणि 'पाणी' सिनेमाच्या टीमला पाणीबाणीचा सामना करावा लागला.

adinath kothare shared experience of shooting paani movie in marathwada | सकाळी उठलो आणि नळाला पाणीच नव्हतं! मराठवाड्यात सिनेमाच्या शूटिंगदरम्यानही 'पाणीबाणी', आदिनाथने सांगितला किस्सा

सकाळी उठलो आणि नळाला पाणीच नव्हतं! मराठवाड्यात सिनेमाच्या शूटिंगदरम्यानही 'पाणीबाणी', आदिनाथने सांगितला किस्सा

आदिनाथ कोठारे अभिनित आणि दिग्दर्शित 'पाणी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठवाड्यातील गावात पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या आणि  त्यावर तोडगा काढण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या हनुमंत केंद्रे यांच्या संघर्षाची कहाणी यातून मांडण्यात आली आहे. सत्य घटनेवर आधारित असलेला हा सिनेमा येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. यानिमित्ताने 'पाणी' सिनेमाच्या टीमशी 'लोकमत फिल्मी'ने खास संवाद साधला. या मुलाखतीत आदिनाथने सिनेमाच्या शूटिंगदरम्यान आलेला अनुभवही सांगितला. 

'पाणी' सिनेमाचं शूटिंग मराठवाड्यातील एका गावात करण्यात आलं आहे. शूटिंग करतानाही आदिनाथ आणि 'पाणी' सिनेमाच्या टीमला पाणीबाणीचा सामना करावा लागला. याचा अनुभव सांगताना आदिनाथ म्हणाला, "आम्ही आधी मुंबई, पुण्याच्या जवळ जागा शोधत होतो. अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. पण, मराठवाड्यासारखी जागा सापडली नाही. मराठवाड्यात डोंगराळ भाग दिसत नाही. त्यामुळे तशी जागा सापडत नव्हती. आणि मराठवाड्यात सिनेमाची टीम घेऊन राहणार कुठे? असा प्रश्न होता. सिनेमातील गाव आता सुजलाम सुफलाम झालं आहे. सिनेमात दुष्काळग्रस्त गाव दाखवायचं असल्याने  तिथे शूटिंग करणं शक्य नव्हतं". 

पुढे तो म्हणाला, "एक जागा सापडली पण, तिथे राहायला जागा नव्हती. संजय पवार यांचं मराठवाड्यात कृषी विद्यापीठ आहे. आम्ही मे महिन्यात शूटिंग करत होतो. त्यामुळे त्यांचं हॉस्टेल रिकामी होतं. पण, तिथे राहण्याची काहीच सोय नव्हती. आम्ही तिथे कमोड, कुलर बसवले. मराठवाडा असल्याने तिथे पाण्याचा प्रॉब्लेम होता. एक दिवस सकाळी उठलो तर नळाला पाणीच नव्हतं. कूलरच्या पाण्याने अंघोळ करून आम्ही शूटिंगला गेलो. असे दिवसही आम्ही बघितले आहेत. शूटिंगदरम्यान आम्ही मराठवाडा आणि तेथील लोकांचं आयुष्य अनुभवलं, जगलो".

'पाणी'मध्ये आदिनाथसोबतच रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील आणि इतर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनास आणि डॉ मधु चोप्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. याशिवाय महेश कोठारे आणि सिद्धार्थ चोप्रा हे या प्रकल्पाचे सहयोगी निर्माते आहेत. १८ ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

Web Title: adinath kothare shared experience of shooting paani movie in marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.