Adipurush : वादात अडकलेल्या 'आदिपुरुष'ने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी केली विक्रमी कमाई, जाणून घ्या आकडा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 11:09 AM2023-06-17T11:09:08+5:302023-06-17T11:10:23+5:30
चित्रपट रिलीज झाल्यापासून याला विरोध सुरु झाला आहे, असं असतानाही बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची गाडी सुसाट आहे.
ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यापासूनच तो वादात अडकला होता. १६ जूनला हा सिनेमा रिलीज झाल्यावर त्यातील सैफ अली खानच्या म्हणजेच रावणाच्या भूमिकेवर अनेकांनी आक्षेप घेतले तर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी हनुमानच्या संवादावर आक्षेप नोंदवला. ऐवढंच नाही तर चित्रपटात भगवान श्रीरामांची खिल्ली उडवण्यात आल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे दिल्लीउच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. या सगळ्यादरम्यान सिनेमाने पहिल्यादिवशी बॉक्स ऑफिसवर केलेल्या कमाईचा आकडा समोर आला आहे, जो थक्क करणार आहे.
५०० ते ६०० कोटींच्या बेजटमध्ये तयार झालेल्या या सिनेमाकडून मेकर्सनी मोठ्या अपेक्षा आहे. त्यामुळे आदिपुरुषच्या टीमने याच्या प्रमोशनमध्ये कोणतीच कसर सोडली नव्हती. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतही रिलीज करण्यात आला. वादात अडकलेल्या या सिनेमाने पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई केली आहे.
एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, आदिपुरुषने पहिल्याच दिवशी जवळपास ८५ ते ९० कोटींची कमाई केलेली आहे. पण यात रात्रीच्या शोचा समावेश नाही.
आदिपुरुष या चित्रपटाने हिंदीत भाषेत ४५ कोटींची कमाई केली आहे. हिंदी भाषिक राज्यांमध्ये या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केल्याचे सांगितलं जातंय. प्रभासचा हा चित्रपट या वीकेंडला धमाकेदार कमाई करेल असे सर्व ट्रेड अॅनालिस्ट्स यांचा अंदाज आहे.
दरम्यान या सिनेमात प्रभास प्रभू श्रीरामांच्या तर क्रिती सनॉन सीतेच्या भूमिकेत दिसत आहे. तर सनी सिंग लक्ष्मणच्या भूमिकेत दिसतोय तर सैफ अली खान लंकापती रावणाच्या भूमिकेत आहे. 'आदिपुरुष' या चित्रपटात मराठमोळा देवदत्त नागे हा हनुमानाची भूमिका साकारत आहे.