बॉलिवूडमधील हा प्रसिद्ध गायक डिजिटल प्लॅटफॉर्मवर करणार पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 05:59 PM2020-02-18T17:59:31+5:302020-02-18T18:01:07+5:30
या गायकाने आजवर अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे.
आरडी बर्मन यांची निपुणता, आशा भोसले यांचा आत्मिक आवाज इथपासून ते बप्पी लहिरींच्या हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या बिट्स, रेहमानचे शांत स्वर इथपर्यंत ८०-९०च्या दशकात हिंदी सिनेसृष्टी सर्वाधिक सांगीतिक तज्ज्ञांनी फुलून गेली होती. या काळाला बॉलिवूडचा सुवर्णकाळ म्हटले जात असून आपण कुणीही वारंवार ही गाणी पुन्हा-पुन्हा ऐकू शकतो.
बॉलिवूडचा हाच सुवर्णकाळ आपल्याला परत जगता यावा, यासाठी सोनी लिव्हतर्फे 'लाईव्ह शाऊट आऊट' हा अनस्क्रिप्टेड ओरिजिनल शो पहिल्यांदाच सादर करण्यात येत आहे. या माध्यमातून डिजिटल व्यासपीठावर आदित्य नारायण प्रथमच प्रवेश करत आहे.
१० भागांच्या या सिरीजमध्ये बॉलिवूडची जुनी गाणी ऐकायला मिळणार आहेत. बॉलिवूडच्या या संगीतदिग्गजांच्या न ऐकलेल्या गोष्टीही या शोमधून आपण ऐकणार आहोत. लाईव्ह शाऊट आऊट या शोचे १४ फेब्रुवारी २०२० रोजी झालेले भाग पाच आठवडे सुरू राहणार असून दर गुरूवारी दोन भाग प्रसारित होणार आहेत.
'लाईव्ह शाऊट आऊट' हा सोनी लिव्हवरचा पहिला नॉन-स्क्रिप्टेड ओरिजिनल शो असून या शोमध्ये सनी हिंदुस्तानी, अद्रिज घोष आणि अंकोना मुखर्जी तसेच सलमान अली, नितीन कुमार, निलांजना राय आणि अंकुश भारद्वाज यांसारख्या गायकांनी गायलेली गाणी आपण पुन्हा ऐकू शकणार आहोत, तीदेखील इंडियन आयडॉलच्या काही निवडक स्पर्धकांसह... रंगमंचावर आकर्षक व्यक्तिमत्वासाठी प्रसिद्ध असलेला आदित्य भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील बॉलिवूडकरांच्या अनेक रंजक कथा आपल्याला या सिरीजमधून सांगणार आहे.
याविषयी आदित्य सांगतो, “संगीत हा माझ्या आयुष्यातला अविभाज्य भाग असून संगीताशी संबंधित असलेली कोणतीही गोष्ट मला रोमांचित करते. हा माझा केवळ डिजिटल विश्वातला पहिला प्रवेशच नव्हे तर जी गाणी ऐकून मी मोठा झालो, ती पुन्हा नव्याने ऐकण्याची संधी मला यामुळे मिळते आहे. किशोर कुमार आणि आरडी बर्मन हे दिग्गज आहेत. त्यांची गाणी आजच्या काळानुसार नव्याने तयार करून ऐकणे हे संगीताचे खरे सेलिब्रेशन असेल. या शोचा भाग झाल्याचा मला खरोखर आनंद होत असून प्रेक्षकांनाही हा शो आवडेल, याची मला खात्री आहे.”