अभिनेत्रींचे साहसी स्टंट
By Admin | Published: January 18, 2016 03:07 AM2016-01-18T03:07:11+5:302016-01-18T03:07:11+5:30
कुठल्याही अभिनेत्रींकडे बघितल्यानंतर साधारणत: सुंदर, नाजूक, प्रेमळ, निरागस अशीच व्यक्तिरेखा समोर येते. मात्र, नाजूक दिसणाऱ्या या अभिनेत्री जेव्हा खरच साहसी स्टंट करतात
कुठल्याही अभिनेत्रींकडे बघितल्यानंतर साधारणत: सुंदर, नाजूक, प्रेमळ, निरागस अशीच व्यक्तिरेखा समोर येते. मात्र, नाजूक दिसणाऱ्या या अभिनेत्री जेव्हा खरच साहसी स्टंट करतात, तेव्हा मात्र, प्रेक्षक थक्क झाल्याशिवाय राहत नाही. विशेष म्हणजे, आताच्या नायिका अशा साहसी दृश्यांमध्ये डमींचा वापर न करता, स्वत:च ते स्टंट करायला इच्छुक दिसतात, याचा प्रत्यय नुकताच आला. एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने एक- दोन नव्हे, तर इमारतीच्या तब्बल ३४ व्या माळयावरून उडी घेतली. नाजूक, निरागस दिसणाऱ्या श्रद्धाने हा स्टंट यशस्वीरीत्या
करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. एकटी श्रद्धाच नाही, तर बॉलीवूडमधील बऱ्याचशा अभिनेत्रींनी असे साहसी स्टंट केले आहेत. यात कोणकोण आहेत, बघा जरा...
सोनाक्षी सिन्हा
आपल्या पहिल्याच चित्रपटात ‘थप्पड से डर नही लगता साहब, प्यार से लगता है’ असे म्हणून भल्याभल्यांना घायाळ करणारी सोनाक्षी सिन्हा स्टंट करण्यात आघाडीवर आहे. तिच्या आगामी ‘अकीरा’ आणि ‘फोर्स-२’ या अॅक्शनपटात तिचा हा हटके अंदाज प्रेक्षकांना बघावयास मिळणार आहे. कारण या दोन्ही चित्रपटात तिने धाडसी स्टंट केले आहेत. यासाठी तिला मिक्स मार्शल आर्टचे ट्रेनिंगही घ्यावे लागले आहे. अकीरा हा चित्रपट महिलांच्या सुरक्षिततेबाबत असून, फोर्स-२ मध्ये ती जॉन अब्राहमसोबत स्पेशल एजंट म्हणून भूमिका साकारत आहे.
प्रियांका चोप्रा
बॉलीवूडमधील सर्वात टफ अभिनेत्रीचा किताब मिळविलेल्या प्रियांका चोपडाचे स्टंट आतापर्यंत बऱ्याच चित्रपटांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले. अॅक्शन सीनसाठी ती नेहमीच परफेक्ट अभिनेत्री राहिली आहे. तिच्या ‘डॉन’ या चित्रपटापासून ते ‘मेरी कोम’पर्यंत तिच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत. ‘क्वॉटिंको’ या मालिकेच्या माध्यमातून प्रियांकाच्या स्टंटची सातासमुद्रापार चर्चा आहे.
कतरिना कैफ
कतरिना कैफने असे स्टंट अनेकदा केले आहेत. ‘धूम-३’ या अॅक्शनपटातील बहुतेक स्टंट तिने स्वत: केले आहेत. त्या व्यतिरिक्त ‘एक था टायगर’, बॅँगबॅँग किंवा आताच्या फॅँटममधील तिचे स्टंट अफलातून आहेत. कॅटच्या स्टंटची चर्चा सुरू असेल, तर बॅँगबॅँगमधील जेट स्की स्टंटचा विशेष उल्लेख टाळताच येऊ शकत नाही.
ऐश्वर्या राय
माजी विश्वसुंदरी असलेल्या ऐश्वर्या राय आणि स्टंट याचा ताळमेळ बसविणे जरा कठीणच वाटते. मात्र, तिनेदेखील ‘धूम-२, जोधा अकबर’ आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘जज्बा’ या चित्रपटात जोरादार स्टंट केले आहेत. जोधा अकबरमधील तिची तलवारबाजी चर्चेचा विषय ठरली होती.
कंगना रानावत
बॉक्स आॅफिसवर कमाईचा रेकॉर्ड करणाऱ्या ‘क्रिश-३’ या चित्रपटात कंगना रानावतने ऋतिक रोशनसोबत अनेक स्टंट केले. या चित्रपटातील तिची भूमिका ‘एक्स मॅन’मधील मिस्टीकशी साम्य असणारी होती. ‘रिव्हॉल्व्हर रानी’ या चित्रपटातही तिने साहस दृश्ये केली आहेत. क्रिश-३ या चित्रपटातील तिची भूमिका शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक होती.
दीपिका पदुकोन
बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री असलेल्या दीपिका पदुकोनने ‘चांदणी चौक टू चायना’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ या दोन्ही चित्रपटातील स्टंट स्वत: केले आहेत. बाजीराव मस्तानीमध्ये तर तिने तब्बल २० किलोंचे शस्त्र अंगावर चढवून हे दृश्य शूट केले.