'अग्गंबाई सूनबाई'नंतर अभिजीत राजे उर्फ डॉ. गिरीश ओक दिसणार या नव्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 12:05 PM2022-03-15T12:05:54+5:302022-03-15T12:07:15+5:30
Dr. Girish Oak:डॉ. गिरीश ओक यांना नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक (Dr. Girish Oak) शेवटचे झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका अग्गंबाई सूनबाई (Aggabai Sunbai)मध्ये पाहायला मिळाले. या मालिकेत त्यांनी साकारलेली अभिजीत राजेंची भूमिका खूपच लोकप्रिय ठरली. त्यानंतर आता ते एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लवकरच ते ३८ कृष्ण व्हिला (38 Krushna Villa) या नाटकात दिसणार आहेत.
‘३८ कृष्ण व्हिला’ हे नवीन नाटक लवकरच रंगभूमीवर दाखल होत आहे. डॉ. गिरीश ओक यांचे हे ५० वे नाटयपुष्प आहे. मल्हार आणि रॉयल थिएटर निर्मित या नाटकाचा शुभारंभ शनिवार १९ मार्चला होणार आहे. ‘ओळखीचा चेहरा की चेहऱ्याची ओळख’? नाटकाची ही टॅगलाइन त्यातील गर्भित अर्थ दाखवून देणारी आहे. प्रत्येकजण येथे आपापले मुखवटे सांभाळून असतो. प्रसंगी त्यांना जपत असतो. मुखवट्याआडचा खरा-खोटा, असेल तसा चेहरा दिसू नये म्हणून काळजी घेत असतो. अंदाज आरशाचा वाटे खरा असावा बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा... गझलकार इलाही जमादार यांच्या या ओळीतुन चेहऱ्यामागचं खरं गुपित उलगडून दाखवलयं ‘38 कृष्ण व्हिला’ या नाटकातूनही चेहऱ्यामागचा माणूस शोधण्याचा प्रयत्न असणार आहे.
‘३८ कृष्ण व्हिला’ नाटकामध्ये डॉ. गिरीश ओक ‘देवदत्त कामत’ या भूमिकेत आपल्यासमोर येणार आहेत. देवदत्त कामत या प्रथितयश व्यक्तीवर नंदिनी चित्रे, ही अनोळखी स्त्री एक गंभीर आरोप करते आणि त्यांच्यापुढे उभे राहते एक नवे आव्हान, स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचे! 38, कृष्ण व्हिला ह्या घरात भरला जातो एक आगळा वेगळा खटला, सुरू होते आरोप प्रत्यारोपांची मालिका, वाद प्रतिवादांच्या फैरी झडतात आणि समोर येते एक धक्कादायक वास्तव! या पार्श्वभूमीवर बेतलेले हे नाटक अनेक रंजक वळणांनी प्रेक्षकांच मनोरंजन करणार असणार आहे.
३८ कृष्ण व्हिला नाटकाचा शुभारंभ लवकरच
डॉ. श्वेता पेंडसे लिखित, विजय केंकरे दिग्दर्शित तसेच डॉ. गिरीश ओक, डॉ. श्वेता पेंडसे अभिनीत ३८ कृष्ण व्हिला’ या नाटकाचा शुभारंभ शनिवार १९ मार्चला दीनानाथ नाटयगृह पार्ले येथे दुपारी ४.१५ वा. होणार आहे. तसेच रविवार २० मार्चला दुपारी ४.३० वा. गडकरी रंगायतन येथे प्रयोग असणार आहे. या नाटकाची निर्मीती मिहीर गवळी यांनी केली असून सहनिर्माते उत्कर्ष मेहता, ऋतुजा शिदम आहेत. नेपथ्य संदेश बेंद्रे तर वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे. संगीत अजित परब तर प्रकाशयोजना शितल तळपदे यांची आहे.