जॅकलिन विरोधात मानहानीचा दावा केल्यानंतर नोरानं अभिनेत्रीवर साधला निशाणा, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 08:39 PM2022-12-16T20:39:52+5:302022-12-16T20:41:33+5:30
Nora Fatehi And Jacqueline Fernandez : नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यातील वाद वाढतच चालला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात सहआरोपी असल्यामुळे चर्चेत आली आहे. सुकेशकडून महागडे गिफ्टस आणि पैसे घेतले. तसेच त्याचे गुन्हे माहित असूनही ते लपवून ठेवल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या चौकशी दरम्यान जॅकलिनने नोरा फतेही(Nora Fatehi)चे नाव देखील ईडी समोर घेतले होते. त्यामुळे नोराची देखील ईडीनं कसून चौकशी केली होती. मात्र त्यात नोरा दोषी आढळली नाही. मात्र त्यानंतर ती जॅकलिनवर चांगलीच संतापली आणि तिने जॅकलिनविरोधात मानहानीचा दावा केला आहे. त्यानंतर आता तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन जॅकलिन फर्नांडिसला चांगलंच झापलं आहे.
नोरा फतेहीने गुरुवारी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने लिहिले की, माझ्या पालकांनी मला लोकांचा फायदा घेण्यासाठी वाढवले नाही, माझा हेतू नेहमीच शुद्ध असतो. आम्ही एकसारख्या नाही. या पोस्टमधून नोराने जॅकलिनवर निशाणा साधला आहे. जॅकलिन फर्नांडिसने आपली बदनामी करण्याचा प्रयत्न केला आणि स्वत:च्या हितासाठी माझे करियर आणि कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, असे नोरा फतेहीचे म्हणणे आहे.
नोरा फतेहीच्या आरोपानंतर जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलाने या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की त्याच्या क्लायंटने सार्वजनिकपणे नोराबद्दल कधीही काहीही सांगितले नाही, त्यामुळे मानहानीचा कोणताही खटला होऊ शकत नाही. एका मुलाखतीदरम्यान प्रशांत पाटील म्हणाले, 'जॅकलिनने नोरा किंवा इतर कोणत्याही व्यक्तीविरोधात कोणत्याही इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट मीडियासमोर कोणतेही वक्तव्य केलेले नाही. ईडीने केलेल्या कारवाईबाबत बोलण्यास तिने जाणीवपूर्वक नकार दिला आहे. आजपर्यंत तिने कायद्याची मर्यादा जपली असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने तिने काहीही बोलण्याचं टाळलं आहे.
जॅकलिनच्या वकिलाने पुढे सांगितले की, नोराने दाखल केलेल्या दाव्याबाबत आम्हाला अद्याप अधिकृतपणे काहीही मिळालेले नाही. मा.न्यायालयाचा आदेश आम्हांला मिळाल्यावर आम्ही त्याला कायदेशीर उत्तर देऊ.