‘महादेव ॲप'नंतर सट्टेबाजी ॲपचे नवे बॉलीवूड कनेक्शन उघड; संजय दत्त, सुनील शेट्टीची दुबईतील पार्टीला हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 06:53 AM2023-10-11T06:53:18+5:302023-10-11T06:57:15+5:30
महादेव ॲपनंतर आता हे नवे ॲप, त्यात झालेले व्यवहार, त्यातील बॉलीवूडचा सहभाग आदी गोष्टींचा तपास आता सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अजेंड्यावर आला आहे.
मुंबई : सट्टेबाजी, हवाला, बॉलीवूड सेलिब्रिटींच्या सहभागामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेल्या महादेव ॲप कंपनीच्या मालकीचे आणखी एक ॲप चर्चेत आले असून, या ॲपच्या सक्सेस पार्टीला अभिनेता संजय दत्त, सुनील शेट्टी यांच्यासह बॉलीवूडमधील अनेक नामवंत कलाकारांनी हजेरी लावल्याची माहिती पुढे आली आहे. महादेव ॲपनंतर आता हे नवे ॲप, त्यात झालेले व्यवहार, त्यातील बॉलीवूडचा सहभाग आदी गोष्टींचा तपास आता सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अजेंड्यावर आला आहे.
‘लायन बुक ॲप’ असे या ॲपचे नाव असून, महादेव ॲपप्रमाणेच भारत व पाकिस्तानमध्ये या ॲपच्या माध्यमातून सट्टेबाजी चालते. महादेव ॲप कंपनीचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांनी हितेश खुशलानी नावाच्या एका व्यक्तीला या नव्या ॲपचा प्रवर्तक केला. मात्र, पडद्यामागून प्रत्यक्ष व्यवहार हे दोघेच चालवत असल्याची माहिती ईडीला मिळाली आहे. या ॲपचे प्रमोशनदेखील बॉलीवूडमधील काही नामवंत कलाकारांनी केले असून, या प्रमोशनकरिता त्यांनी रोखीने मानधन स्वीकारले आहे, ही रोख रक्कम हवालाच्या माध्यमातून आली होती. त्यामुळे ते कलाकारदेखील आता ईडीच्या रडारवर आले आहेत.
दुबईतील आलिशान हॉटेलमध्ये पार्टी
या ॲपची सक्सेस पार्टी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दुबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये झाली. या पार्टीकरिता अभिनेता संजय दत्त, सुनील शेट्टी, डेझी शहा, सोफी चौधरी अशा कलाकारांनी उपस्थिती लावल्याचे समजते. महादेव ॲपप्रकरणी तपास यंत्रणेने आतापर्यंत ४१७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. तसेच सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस देखील जारी केली आहे. या दोघांनी आणखी काही वेबसाईट आणि ॲप तयार केल्याचा ईडीला संशय आहे.
बड्या कलाकारांना ‘रोखीने’ मानधन
महादेव ॲपचे सोशल मीडियावर प्रमोशन केल्याप्रकरणी ईडीने अभिनेता रणबीर कपूर याला ६ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी समन्स जारी केले होते. मात्र, त्याने दोन आठवड्यांची मुदत मागितली आहे, तर या ॲपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर याच्या फेब्रुवारीत दुबईत झालेल्या विवाहाला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावत आपली कला सादर केली होती. यामध्ये गायिका नेहा कक्कर, आतीफ अस्लम, राहत फतेह अली खान, अली असगर, विशाल दादलानी, भारती सिंग, सनी लिऑन, भाग्यश्री, कीर्ती खरबंदा, नुसरत भरूचा, कृष्णा अभिषेक, आदींचा समावेश होता.
महादेव ॲपप्रकरणी ईडीने गेल्या आठवड्यात शुक्रवार व शनिवार अशा दोन दिवशी मुंबईतील पाच चित्रपट व मालिका निर्मात्या कंपन्यांच्या कार्यालयांवर छापेमारी केली आहे. महादेव ॲप कंपनीने या पाच कंपन्यांमध्ये पैसे गुंतवल्याचा ईडीला संशय असून, त्याच अनुषंगाने ही छापेमारी केल्याची माहिती आहे.