'पद्मावत'नंतर कंगनाचा 'मनकर्णिका' रडारवर; ब्राह्मण महासभेचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 10:38 AM2018-02-06T10:38:15+5:302018-02-06T10:56:06+5:30
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित 'मनकर्णिका: द क्वीन ऑफ झासी' या चित्रपटात कंगना मुख्य भूमिकेत आहे.
मुंबई: 'पद्मावत' या चित्रपटानंतर आता अभिनेत्री कंगना राणौत हिचा नवा चित्रपट कडव्या विचारसरणीच्या संघटनांचे लक्ष्य ठरण्याची शक्यता आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित 'मनकर्णिका: द क्वीन ऑफ झासी' या चित्रपटात कंगना मुख्य भूमिकेत आहे. सध्या या चित्रपटाचे शुटिंग सुरू आहे. हा चित्रपट राणी लक्ष्मीबाई यांच्यापासून प्रेरित असला तरी तो त्यांचा चरित्रपट नाही, असे निर्मात्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र, तरीदेखील सर्व ब्राह्मण महासभेने इतिहासाची मोडतोड केल्याचा आक्षेप घेत या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आगामी काळ 'मनकर्णिका'साठी अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे.
या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर ब्राह्मण महासभेने 'मणकर्णिका'चे चित्रीकरण थांबवण्यासाठी राजस्थान सरकारला तीन दिवसांचा अल्टिमेटमही दिला आहे. या चित्रपटात राणी लक्ष्मीबाई यांचे एका इंग्रजी अधिकाऱ्याशी प्रेमसंबंध असल्याचे दाखवण्यात आले आहे. मुळात हा चित्रपट एका परदेशी लेखकाच्या पुस्तकावर आधारित आहे. त्यामुळे राणी लक्ष्मीबाई यांची प्रतिमा मलिन होत आहे. याप्रकरणी चित्रपटाच्या निर्मात्यांनी योग्य ते स्पष्टीकरण द्यावे. जोपर्यंत ते उत्तर देत नाहीत तोपर्यंत राजस्थानमध्ये या चित्रपटाचे शुटिंग करू देणार नाही, असा इशारा ब्राह्मण महासभेचे अध्यक्ष पंडित सुरेश मिश्रा यांनी दिला.
राणी लक्ष्मीबाई यांचे इंग्रज अधिकाऱ्याशी प्रेमसंबंध होते, ही कल्पनाही सहन होणारी नाही. त्यांनी तरूण वयात इंग्रजांशी लढताना प्राणांचे बलिदान दिले. त्यामुळे त्यांच्यावर आधारित चित्रपट हा त्यांचा चरित्रपटच असायला पाहिजे, असे मिश्रा यांनी सांगितले.
सूत्रांच्या माहितीनुसार, हा चित्रपट लेखिका जयश्री मिश्रा यांच्या 'रानी' पुस्तकावर आधारित आहे. या पुस्तकात ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी रॉबर्ट एलिस आणि राणी लक्ष्मीबाई यांचे प्रेमसंबंध असल्याचा उल्लेख आहे. 2008 साली उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी या पुस्तकावर बंदी घातली होती. मात्र, सध्या हे पुस्तक ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहे.
यापूर्वी ब्राह्मण महासभेने ‘पद्मावत’वरुन राजपूत संघटनांना पाठिंबा दिला होता. आता 'मणिकर्णिका'वरुन राजपूत संघटनांनी ब्राह्मण महासभेला पाठिंबा दर्शवला आहे. चित्रपटाचे निर्माते कमल जैन यांनी या वादावर अद्यापपर्यंत प्रतिक्रिया दिलेली नाही.