शिवानी रांगोळे-विराजस कुलकर्णी यांच्यानंतर आता ही मराठमोळी अभिनेत्री अडकली लग्नबेडीत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 11:08 AM2022-05-17T11:08:44+5:302022-05-17T11:09:15+5:30
गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नाचे वारे वाहताना दिसत आहे. दरम्यान आता आणखी एक अभिनेत्रीनं लग्नगाठ बांधली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नाचे वारे वाहताना दिसत आहे. ३ मे रोजी अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Rangole) आणि विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) यांचा लग्नसोहळा पार पडला. तर सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिने लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लंडनमध्ये कुणाल बेनोडेकर सोबत पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे. हैद्राबाद कस्टडी या आगामी चित्रपटातील नायिका म्हणजेच पीएसआय पल्लवी जाधव (Pallavi Jadhav) या नुकत्याच विवाहबंधनात अडकल्या आहेत.
पल्लवी जाधव यांच्या लग्नातील मेहेंदी आणि हळदीचा सोहळा मोठ्या थाटात पार पडलेला पाहायला मिळाला. रविवारी १५ मे २०२२ रोजी औरंगाबादमधील सुर्या लॉन्समध्ये पल्लवी जाधव आणि कुलदीप यांचा लग्न सोहळा पार पडला. लग्नाचे काही खास फोटो पल्लवी यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांच्या या आनंदाच्या बातमीवर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
पल्लवी जाधव यांनी अतिशय खडतर प्रवास करत पीएसआय बनण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी सौंदर्य स्पर्धा गाजवून हैद्राबाद कस्टडी या चित्रपटातून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. पल्लवी जाधव या मूळच्या औरंगाबादमधील रेल गावच्या आहेत. बालपणापासून त्यांना अभिनेत्री व्हायचे होते. मात्र जसे कळू लागले की आपली आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे तसे हे स्वप्न स्वप्नच राहणार याची जाणीव पदोपदी होत गेली. पुढे लग्नाच्या चिंतेने आई वडिलांनी पुढील शिक्षणासाठी नकार दिला. मात्र यातूनही मार्ग काढून शिक्षण न थांबवता परिश्रम घेत राहण्याचा निर्धार पक्का केला.
आर्थिक परिस्थिची जाण असलेल्या पल्लवी यांनी एमपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू केला. आई वडिलांनी बचत गटातून ५ हजारांचे कर्ज काढून दिले. कमवा आणि शिका या योजनेतून एम ए मानसशास्त्रमध्ये पदवी मिळवली. याच वर्षी दुसऱ्या प्रयत्नात पीएसआय परीक्षेत देखील यश मिळविले.
पल्लवी जाधव जालनामधील महिला सुरक्षेसाठी नेमलेल्या दामिनी पथकाच्या दबंग अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. जयपूरमध्ये झालेल्या ग्लॅमॉन मिस इंडिया स्पर्धेत त्यांनी फर्स्ट रनर अप हा किताब जिंकला. अधिकारी बनण्याचे स्वप्न तर त्यांचे पूर्ण झालेच तर आता लवकरच बबन चित्रपट दिग्दर्शक भाऊराव कराडे यांच्या चित्रपटातून अभिनेत्री बनून लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहेत.