पुन्हा एक रटाळ चित्रपट
By Admin | Published: April 9, 2017 03:24 AM2017-04-09T03:24:42+5:302017-04-09T03:24:42+5:30
कधीकधी चित्रपट कसा आहे, हे सांगणेच कठीण होऊन बसते़ ‘लाली की शादी में लड्डू दिवाना’बद्दलही असेच म्हणता येईल. याची पटकथा इतकी रटाळ आणि अतार्किक आहे, की हा
- जान्हवी सामंत
हिंदी चित्रपट - लाली के शादी में लड्डू दिवाना
कधीकधी चित्रपट कसा आहे, हे सांगणेच कठीण होऊन बसते़ ‘लाली की शादी में लड्डू दिवाना’बद्दलही असेच म्हणता येईल. याची पटकथा इतकी रटाळ आणि अतार्किक आहे, की हा संपूर्ण चित्रपट म्हणजे वेळेचा अपव्यय असेच म्हणता येईल. म्हणायला चित्रपटाचे भाग अतिशय संवेदनशील आणि विनोदी आहेत; पण एकूण चित्रपटाचे म्हणाल तर हा एक अतिशय कंटाळवाण्या चित्रपटाच्या यादीत मोडणारा आहे.
लाली (अक्षरा हासन) आणि लड्डू (विवान शहा) नावाच्या प्रेमी युगुलाभोवती फिरणारी ही कथा. महत्त्वाकांक्षा, भोगवादी टिपिकल मॉडर्न शहरी कपलमध्ये मोडणारेच हे कपल असते. बडोद्यात दोघेही कुटुंबापासून दूर एकटे राहत असतात. डोळ्यांत मोठमोठी स्वप्ने, मनात आकाश कवेत घेण्याची ऊर्मी असे हे कपल स्वत:ची नोकरी आणि व्यक्तिगत आयुष्य यात ताळमेळ घालण्याच्या प्रयत्नात असते. पण याच वळणावर लग्नाआधी लाली लड्डूपासून गर्भवती राहते आणि मग त्यांच्या नात्याच्या कसोटीचा क्षण पुढे येऊन ठेपतो. लड्डूला या वयात मुलाची जबाबदारी नको असते. कारण त्याला त्याची स्वप्ने खुणावत असतात. पण लाली या बाळाला जगात आणू इच्छिते़. लड्डू बडोद्यात पुन्हा आपल्या कामात गुंततो; तर लाली बडोदा आणि लड्डूला मागे सोडून पुढे निघते. अर्थात काळासोबत लड्डूला आपली चूक उमगते. पण तोपर्यंत उशीर झालेला असतो.
लालीच्या आयुष्यात वीर (गुरमीत चौधरी)ची एन्ट्री झालेली असते. वीर लालीला तिच्या पोटातल्या बाळासकट स्वीकारायला तयार असतो. मग एकापाठोपाठ एक असे ट्विस्ट येतात आणि कुठल्याही टिपिकल हिंदी चित्रपटाप्रमाणे कथेचा शेवट होतो.
चित्रपटातील काही भाग संवेदनशीलपणे मनाचा ठाव घेतात. विवान शहा, सौरभ शुक्ला आणि सौरभ मिश्रा यांच्यातले काही प्रसंग निश्चितपणे उत्कृष्ट आहेत. पण चित्रपटाची पटकथा अतिशय दुबळी वाटते़. अक्षरा व विवान या दोघांनी त्यांच्यातील संपूर्ण ऊर्जा आपापल्या भूमिकेत ओतली आहे. गुरमीत चौधरीनेही अधिक परिपक्व अभिनय केला आहे. पण तरीही हा चित्रपट कंटाळा आणतो आणि सो-सो चित्रपटांच्या यादीत बसतो.