...पुन्हा जादुई दुनियेत झळकणार

By Admin | Published: October 24, 2016 02:35 AM2016-10-24T02:35:45+5:302016-10-24T02:35:45+5:30

अ‍ॅकॅडमी अ‍ॅवॉर्डविजेती टिल्डा स्विंटन ही मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सनिर्मित ‘डॉक्टर स्ट्रेंज’ या चित्रपटात ‘अ‍ॅसिएंट वन’ या भूमिकेत दिसणार आहे.

... again in the magical world | ...पुन्हा जादुई दुनियेत झळकणार

...पुन्हा जादुई दुनियेत झळकणार

googlenewsNext

अ‍ॅकॅडमी अ‍ॅवॉर्डविजेती टिल्डा स्विंटन ही मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सनिर्मित ‘डॉक्टर स्ट्रेंज’ या चित्रपटात ‘अ‍ॅसिएंट वन’ या भूमिकेत दिसणार आहे. ती पहिल्यांदाच या हाऊससोबत काम करीत असून, पुन्हा एकदा ती जादुई दुनियेत रमताना बघावयास मिळेल. यापूर्वीदेखील टिल्डाने जादुई कथेवर आधारित असलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या भूमिका प्रेक्षकांना भावल्या आहेत. आता ती पुन्हा एकदा याच अवतारात दिसणार असल्याने प्रेक्षक तिची भूमिका कितपत पसंत करतील, हे आगामी काळात कळेलच. या भूमिकेबाबत तिच्याशी साधलेला संवाद...


ही भूमिका साकारताना तुला कुठली गोष्ट आकर्षित करीत होती?
मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्ससोबत काम करण्याचे आमंत्रण माझ्यासाठी एक सुवर्णसंधीच आहे. त्यातही ‘द अ‍ॅसिएंट वन’ हे पात्र साकारणे मला सर्वाधिक प्रभावित करणारे आहे. खरं तर मला याअगोदर ‘ड्रॉक्टर स्ट्रेंज’विषयी काहीच माहिती नव्हते. मात्र, ज्या वेळी मला या भूमिकेविषयी सांगितले गेले तेव्हा मी मुग्ध झाले. त्यामुळे मी या चित्रपटाबाबत उत्साही असून, प्रेक्षकांना माझी भूमिका आवडेल, अशी मला खात्री वाटते.
चित्रपटातील तुझ्या भूमिकेबाबत तुला सखोल माहिती दिली होती का?
हो, चित्रपट जादुई दुनियेवर आधारित असल्याचे त्यांनी मला अगोदरच स्पष्ट केले होते. त्यासाठी त्यांनी मला काही कॉमिक दाखविले. शिवाय डॉक्टर स्ट्रेंज या कथेचे मूळ कुठे आहे, त्याविषयीचे लिखाणही वाचण्यास दिले होते. सुरुवातीला मला माझ्या भूमिकेच्या सस्पेन्सविषयी चिंता वाटत होती; परंतु जेव्हा त्यांनी मला याबाबतची सखोल माहिती दिली तेव्हा माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला. कारण कुठलीही भूमिका साकारताना त्याविषयीची अगोदर माहिती दिल्यास कलाकाराच्यादृष्टीने फायद्याचेच असते.
तुला भरपूर कॉमिक वाचावे लागले का?
होय, पण हे मजेशीर होते. जेव्हा मी ही भूमिका करायची स्वीकारले तेव्हाच मी याविषयीचे काही कॉमिक वाचले होते. थोडक्यात मी या पात्राविषयी जाणून होते. या कथेचे मूळ १९६३ मध्ये लिहिण्यात आले आहे. हे सुरुवातीलाच माझ्या वाचण्यात आलेले असल्याने मी माझ्या भूमिकेविषयी मोकळा श्वास घेतला हाता; परंतु माझे संपूर्ण लक्ष चित्रपटाच्या पटकथेवर होते. कारण तेथूनच भूमिकेला न्याय देणे शक्य होते.
चित्रपटातील ‘अ‍ॅसिएंट वन’ या तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील?
मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्ससोबत काम करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा, की त्यांचे चित्रपट हे सर्वात जास्त ग्राफिक आर्टिस्ट यांच्या कलाकृतीवर आधारित असतात. त्यांच्या कथाही अनेक शतके लोकांच्या तोंडी असलेल्या किंवा वाचलेल्या असतात. त्यांच्यासोबत काम करताना एक लवचिकता असते. भरपूर स्वातंत्र्य अनुभवयास मिळते. जेव्हा मला मार्व्हल युनिव्हर्सने ही भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले तेव्हा मी हे पात्र साकारण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय मला फायद्याचा ठरला, कारण मला काही आशियाई कलाकारांसोबत काम करायला मिळाले. मला या भूमिकेने एक महत्त्व प्राप्त करून दिले आहे. तसेच भरपूर काही शिकायलाही मिळाले आहे. आतापर्यंत साकारलेल्या जादुई भूमिकेपेक्षा अतिशय वेगळी आणि आव्हानात्मक भूमिका म्हणून मी याकडे बघते. तसेच हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम अनुभव असल्याचे मला वाटते. प्रेक्षकांना माझी भूमिका आवडेल याची खात्री नव्हे, तर मला विश्वास आहे.

Web Title: ... again in the magical world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.