विमान उडते अधांतरी !
By Admin | Published: August 22, 2015 11:35 PM2015-08-22T23:35:46+5:302015-08-22T23:35:46+5:30
अजिंक्यतारा पुरस्कार सोहळा या आठवड्यात मॉरिशसमध्ये पार पडणार होता. अशा नव्याने सुरू होणाऱ्या पुरस्कार सोहळ््यांसाठी ग्लॅमरस चेहऱ्याची गरज लागते. ती ओळखून सई
- राज चिंचणकर
अजिंक्यतारा पुरस्कार सोहळा या आठवड्यात मॉरिशसमध्ये पार पडणार होता. अशा नव्याने सुरू होणाऱ्या पुरस्कार सोहळ््यांसाठी ग्लॅमरस चेहऱ्याची गरज लागते. ती ओळखून सई ताम्हणकरला फेस आॅफ द इयर पुरस्कार जाहीर केला गेला. तसेच या पुरस्कार सोहळ््यात अभिजीत केळकर, पूजा सावंत, अमृता खानविलकर, मानसी नाईक इत्यादी कलाकार विविध कार्यक्रम सादर करण्यात येणार होते. या सोहळ््यासाठी विमानतळावर पोहोचलेल्या ८० पेक्षा अधिक कलाकारांचा अपेक्षाभंग झाला. कारण ऐनवेळी आयोजकांनी माघार घेतल्याचे त्यांना समजले. अशा प्रकारच्या घटना सध्या इंडस्ट्रीत वाढत असून, त्यावर आता कलाकारांनीच गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत ‘उदंड जाहले पुरस्कार’ अशी एकूणच स्थिती आहे. त्यात अजिंक्यतारा पुरस्कार सोहळ्याची भर पडली आणि हा सोहळा थेट मॉरिशस मुक्कामी होण्याचे जाहीर झाल्यावर अनेकांचे विमान सोहळ्याआधीच आकाशात उडू लागले. वास्तविक या आयोजक मंडळींचा हा पहिलावहिला पुरस्कार सोहळा असल्याने त्याविषयी प्रचंड उत्सुकता तर होतीच; परंतु एका नव्या पुरस्काराची मुहूर्तमेढ रोवल्याचा सार्थ अभिमानही होता. साहजिकच तो आयोजकांसह यात नामांकने प्राप्त झालेल्या कलाकारांनाही होता. परिणामी, या सोहळ्याच्या तारखा जाहीर झाल्यापासूनच अनेकांचे विमान हवेत तरंगायला लागले होते. मात्र हे विमान केवळ अधांतरीच लटकणार, असे स्वप्नात येण्यापूर्वीच ते जमिनीवर कोसळून त्याचा पार चक्काचूर झाला.
विमानोड्डाणाची वेळ जवळ येऊन ठेपली तसे मॉरिशस वारीवर निघालेले वऱ्हाड विमानतळावर डेरेदाखल झाले, पण इथेच माशी शिंकली. हा सोहळा अचानक रद्द झाल्याचा ‘मेसेज’ भल्या पहाटे तमाम वऱ्हाडी मंडळींच्या हाती पडताच त्यांचे विमान न उडताच धाडकन जमिनीवर आपटले. एवढेच नव्हे, तर सोहळा रद्द होण्यामागचे कारण स्पष्ट न झाल्याने या मंडळींची नाराजी संतापात बदलली. अर्थात अशी घटना कोणाच्याही बाबतीत घडली असती तरी मानसिक त्रास होणे अपरिहार्यच आहे. पण इथे समस्त मराठी चित्रपटसृष्टीचा प्रश्न असल्याने त्याचा ‘प्रेस्टीज इश्यू’ व्हायला वेळ लागला नाही. शेवटी व्हायचे तेच झाले. या कलावंत मंडळींचा पारा चढला आणि ज्या कुणामुळे हा सावळागोंधळ घडला त्यांच्याकडून माफीनाम्याची अपेक्षाही केली गेली. बरं, सोहळा रद्द का झाला याचे स्पष्ट कारण देण्यासही कुणी तयार नाही. मग त्यादृष्टीने रोजच्या कामात प्रचंड व्यस्त असणाऱ्या कलाकारांचा हा अपमान आहे, हे म्हणणेही सयुक्तिक ठरावे. कारण शेवटी मेहनतीला पर्याय नाही आणि या कलाकारांनी या सोहळ्यासाठी बाजूला काढून ठेवलेल्या तारखांचा ताळेबंद कसा जमवणार, हाही प्रश्नच आहे.
मराठी कलाकारांना आणि त्यांच्या मेहनतीला गृहीत धरू नये, याविषयी वाद होण्याचे कारण नाही. त्यांची ही ‘भूमिका’ रास्तच म्हणायला हवी. परंतु अशाप्रकारचा सोहळा आयोजित करण्याची ज्यांची पहिलीच खेप आहे आणि ती सुद्धा परदेशात; त्यांच्याबद्दल साधी चौकशी करण्याचेही कुणाला सुचू नये, याचेच आश्चर्य आहे. परदेशात आयोजित केलेल्या या सोहळ्यात आपली व्यवस्था नक्की व्यवस्थित ठेवली गेली आहे की नाही, याचा विचार करण्यापेक्षा केवळ परदेशवारीचे सुख पदरात पडते आहे ना, मग झाले तर असा विचार केला गेला नसेल कशावरून? या सोहळ्यासाठी आयोजकांनी कलाकारांना मानाने बोलावले असले तरी कलावंतांनी आपली प्रतिष्ठा आणि रसिकांच्या मनातले आपले स्थान याचा विचार प्रामुख्याने करणे इथे अपेक्षित होते. कलाकारांच्या जीवावरच असे पुरस्कार सोहळे आयोजित करण्यात येतात याचा कलावंतांना विसर पडला की काय, असाही प्रश्न निर्माण होतो. कुणीतरी उठायचे, पुरस्कार देतो असे म्हणायचे आणि आपल्या कलाकारांनी त्यावर सहज विश्वास ठेवायचा यातून निघणारा अर्थ, या कलाकारांचे मायबाप रसिकांच्या मनातले स्थान डळमळीत करणारा आहे. बरेचवेळा चित्रपटांतून अभिनय करताना काही कलाकारांनी यातली भूमिका का स्वीकारली, असा प्रश्न रसिकजनांच्या आजकाल मनात डोकावतोच आणि त्याचे उत्तर मिळण्याइतके आजचा रसिक जाणता आहे. तीच री पुरस्कार सोहळ्यांबाबत ओढली गेली असल्यास कठीणच आहे. हल्ली कलावंतांच्या कर्तृत्वापेक्षा अशा पुरस्कारांची उंची अधिक भासू लागली आहे, याकडे या मंडळींचे लक्ष जाईल तो सुदिन म्हणायचा. कलावंतांनी आपल्या मुखवट्यामागच्या खऱ्याखुऱ्या चेहऱ्याचे दर्शन कधी आरशाला घडवले, तरच रसिकजनांच्या मनातली उंची कायम राखण्याचे श्रेय या मंडळींना घेण्याजोगी स्थिती भविष्यात असू शकेल.