सोयरे सकळ या नाटकाच्या लूकवरून निर्माण झाली रसिकांमध्ये उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 09:30 PM2018-12-17T21:30:00+5:302018-12-17T21:30:02+5:30
सोयरे सकळ या नाटकाचे पहिले पोस्टर नुकतेच रसिकांच्या भेटीस आले आहे. या पोस्टरची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या नाटकात अनेक कलाकार असल्याचे या पोस्टरवरूनच आपल्याला कळून येत आहे.
गेल्या काही काळापासून मराठी रंगभूमीवर खूपच वेगवेगळ्या प्रकारची नाटकं प्रेक्षकांच्या भेटीस येत असून या नाटकांना रसिकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता असेच एक वेगळ्या विषयावरचे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत असून या नाटकांमध्ये मराठी रंगभूमीवरील अनेक चांगले कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
प्रसाद कांबळी यांच्या भद्रकाली प्रोडक्शनने आजवर एकाहून एक सरस नाटकं रंगभूमीला दिली आहेत. गेल्या वर्षी रसिकांच्या भेटीस आलेल्या संगीत देवबाभळी या नाटकाला तर रसिकांची चांगलीच पसंती मिळाली होती. या नाटकाला अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. आता भद्रकाली प्रॉडक्शनची 56 वी नाट्यकृती रसिकांच्या भेटीस येणार आहे. या नाटकाचे नाव सोयरे सकळ असे असून या नाटकाचा पहिला प्रयोग 22 डिसेंबरला दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले येथे होणार आहे.
सोयरे सकळ या नाटकाचे पहिले पोस्टर नुकतेच रसिकांच्या भेटीस आले आहे. या पोस्टरची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या नाटकात अनेक कलाकार असल्याचे या पोस्टरवरूनच आपल्याला कळून येत आहे. या नाटकात आशुतोष गोखले, अश्विनी कासार, आदित्य इंगळे, अनुया बेचे, सुनील तांबट आणि ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या नाटकाच्या पोस्टरमध्ये कलाकार भारतीय पेहरावात दिसत आहे. या सगळ्यांचा लूक पाहून रसिकांना एका वेगळ्या विषयावरचे नाटक पाहायला मिळणार याची त्यांना खात्री पटली आहे. विशेष म्हणजे या नाटकात अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर हे खऱ्या आयुष्यातील जोडपं काम करणार आहे.
सोयरे सकळ या नाटकाचे लेखन डॉ. समीर कुलकर्णी यांचे असून दिग्दर्शन आदित्य इंगळे यांचे आहे. नाटकाची नेपथ्य आणि प्रकाशयोजना प्रदीप मुळ्ये यांची असून अजित परब यांनी या नाटकाला संगीत दिले आहे. या नाटकाची वेशभूषा गीता गोडबोले यांनी केली आहे. या नाटकाचा दुसरा प्रयोद 25 डिसेंबरला यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे होणार आहे.