अजय-अतुलची नवी इनिंग
By Admin | Published: July 1, 2015 03:54 AM2015-07-01T03:54:14+5:302015-07-01T03:54:14+5:30
प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल मराठी चित्रपटनिर्मितीत उतरत आहेत. कोणतेही काम भव्य-दिव्य करण्याबाबत ते प्रसिद्ध असल्याने या चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.
प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल मराठी चित्रपटनिर्मितीत उतरत आहेत. कोणतेही काम भव्य-दिव्य करण्याबाबत ते प्रसिद्ध असल्याने या चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.
मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या नावाचा डंका वाजविणारे संगीतकार अजय-अतुल आता चित्रपट निर्मितीची नवी इनिंग खेळण्यास सज्ज झाले आहेत. निर्माता म्हणून ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’ हा त्यांचा नवा चित्रपट लवकरच रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. विशेष म्हणजे, अजय-अतुलसारखाच पक्का पुणेकर असलेला गिरीश कुलकर्णीही या निमित्ताने दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांसमोर येत आहे.
आपल्या जादुभऱ्या संगीताने अजय-अतुल यांनी मराठी चित्रपटांना एक वेगळी ओळख दिली. त्यानंतर हिंदीमध्येही ही जोडी उत्तुंग यश मिळवित आहे. तरीही मराठी चित्रपट हेच पहिले प्रेम असल्याने, आता थेट चित्रपटनिर्मितीमध्ये उतरण्याचा निर्णय त्यांनी घेतला. संगीतामध्ये भव्य-दिव्य कामगिरी करणाऱ्या अजय-अतुलच्या चित्रपटांकडूनही तशाच भव्य निर्मितीच्या अपेक्षा असणे साहजिक आहे. याबाबत अतुल म्हणाला, ‘प्रेक्षकांना आमच्याकडून ज्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. सिनेमा हॉलमधून बाहेर पडताना प्रेक्षक अजय-अतुल यांचे काहीतरी नवीन घेऊन जाणार, हे नक्कीच.’
चित्रपटाच्या निर्मितीचा प्रवास उलगडताना अजय म्हणाला, ‘चित्रपटनिर्मिती करायची तर छान कथा असायला हवी, असे आमचे ठरले होते. एकदा गिरीश कुलकर्णीसोबत चर्चा सुरू असताना, त्याने एक कथा ऐकवली. आम्ही लगेच होकार दिला.’
गिरीश मुख्य भूमिकेसह दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या समोर येतोय. सई ताम्हणकरसह बरेच दिग्गज कलाकार या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार, असेही अतुलने सांगितले.
अजय म्हणाला, ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’ म्हणजे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सिनेमा असल्याचे वाटते; पण असे काहीही नाही. बाळासाहेब नाव असलेल्या कुणाचाही या सिनेमातील पात्राशी संबंध नाही.