Bholaa Box Office Collection Day 1: अजय देवगणच्या ‘भोला’ने पहिल्या दिवशी किती केली कमाई, पाहा आकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 10:24 AM2023-03-31T10:24:24+5:302023-03-31T10:24:48+5:30
Bholaa Box Office Collection Day 1: ‘भोला’तील अजय देवगणच्या अभिनयाचं जोरदार कौतुक होतंय. सोशल मीडियावरही हा सिनेमा फुल्ल पैसा वसूल असल्याच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. बॉक्स ऑफिसवरही ‘भोला’ची काय स्थिती आहे?
Bholaa Box Office Collection Day 1: अजय देवगणच्या (Ajay Devgn) याआधी रिलीज झालेल्या ‘दृश्यम २’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. काल रामनवमीच्या मुहूर्तावर अजयचा ‘भोला’ (Bholaa) हा सिनेमा रिलीज झाला. रिलीजआधी या सिनेमाची जोरदार हवा होती. साहजिकच सगळ्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. ‘पठाण’ आणि ‘तू झुठी में मक्कर’नंतर सर्वांच्या नजरा अजय देवगणच्या ‘भोला’ या चित्रपटाकडे लागल्या होत्या. तर आता ‘भोला’च्या पहिल्या दिवशीच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.
‘भोला’तील अजय देवगणच्या अभिनयाचं जोरदार कौतुक होतंय. सोशल मीडियावरही हा सिनेमा फुल्ल पैसा वसूल असल्याच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. बॉक्स ऑफिसवरही ‘भोला’ची काय स्थिती आहे तर या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं चित्र आहे.
‘भोला’ची क्रेझ पाहता हा सिनेमा पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धमका करणार, असं वाटलं होतं. ‘पठाण’सारखा हा सिनेमाही ब्लॉकबस्टर ठरणार, अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात ‘पठाण’ची बरोबरी करणं तर दूर पहिल्या दिवशी ‘भोला’ हा सिनेमा ‘पठाण’च्या आसपासही पोहाेचू शकला नाही.
शाहरूखच्या ‘पठाण’ने पहिल्याच दिवशी सर्व भाषांमध्ये ५७ कोटींची कमाई केली होती. ‘भोला’चं म्हणाल तर पहिल्या दिवशी या सिनेमाने ११.५० कोटींची कमाई केली आहे. अजय देवगणच्या याआधीच्या ‘दृश्यम २’ या सिनेमाने पहिल्या दिवशी १५.३८ कोटींचा गल्ला जमवला होता.
अजय देवगणच्या भोलाचं बजेट हे जवळपास १०० कोटी असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे पहिल्या दिवशीच्या कमाईचे आकडे फार काही समाधानकारक नाहीत. कालच्या रामनवमीच्या सुट्टीचाही ‘भोला’ला फार फायदा झालेला दिसला नाही. अर्थात वीकेंडला ‘भोला’च्या कमाईत मोठी वाढ होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.
अजय देवगण दिग्दर्शित ‘भोला’ हा २०१९ मध्ये आलेल्या ‘कैथी’ या तमिळ चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे. चित्रपटात अजय देवगणसोबत तब्बू या सिनेमात लीड रोलमध्ये आहे. याशिवाय मकरंद देशपांडे, दीपक डोबरियाल आणि गजराज राव हेही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.