'आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं..', ‘सुभेदार’ चित्रपटातील तानाजी मालुसरेंच्या कुटुंबाची पहिली झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 12:32 PM2023-07-12T12:32:01+5:302023-07-12T12:42:18+5:30

शौर्याचे पराक्रमी पान उलगडणारा दिग्पाल लांजेकर लिखित दिग्दर्शित ‘सुभेदार’ हा चित्रपट २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

Ajay purkar shivani rangole movie tanaji malusare new poster out | 'आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं..', ‘सुभेदार’ चित्रपटातील तानाजी मालुसरेंच्या कुटुंबाची पहिली झलक

'आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं..', ‘सुभेदार’ चित्रपटातील तानाजी मालुसरेंच्या कुटुंबाची पहिली झलक

googlenewsNext

महाराजांच्या प्रत्येक मावळ्याने स्वराज्यासाठी सर्वस्वाचा त्याग  केला. आयुष्यात फक्त एकच देव मानून कार्य करत राहिले, ते देव म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. हिंदवी स्वराज्याच्या शूर मावळ्यांचे शौर्य जाणून घेताना त्यांच्या व्यक्तिगत  आयुष्याचे  पदर फार क्वचित चित्रपटातून पहायला मिळतात. नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे हे तर शिवचरित्राच्या महान ग्रंथातील एक झळाळते सुवर्णपान!  त्यांचे भावनिक आणि  कौटुंबिक आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न करत त्यांच्या शौर्याचे पराक्रमी पान उलगडणारा दिग्पाल लांजेकर लिखित दिग्दर्शित ‘सुभेदार’ हा चित्रपट २५ ऑगस्टला  प्रेक्षकांच्या भेटीला  येतोय. 

आपले शौर्य, निष्ठा यांच्यासह बलिदान देऊन स्वराज्याचा पाया बळकट करणारे नरवीर तान्हाजी  मालुसरे ! स्वराज्याच्या सेवेतील कामगिरीपुढे त्यांना आपल्या संसाराचेही भान नव्हते. स्वतःच्या मुलाचं लग्न काढलं असताना सिंहगड मोहिमेचा सांगावा आल्यानंतर हा धैर्याचा मेरुपर्वत काळासारखा धावून गेला अन वचनाच्या पूर्ततेसाठी मागे न हटता आपला अनमोल देह स्वामी निष्ठेपायी शिवप्रभूंच्या चरणी ठेवला. 'आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं' अशी गर्जना करत मोहीम फत्ते करणाऱ्या या शूर योद्ध्याला त्यांच्या कुटुंबाने ही  तितकीच मोलाची साथ दिली. हा भावनिक पदर ही ‘सुभेदार’ चित्रपटात पहायला मिळणार असून आपल्या मुलाच्या रायबाच्या लग्नाच्या तयारीत गुंतलेल्या समस्त मालुसरे कुटुंबीयांच आगामी ‘सुभेदार’ या चित्रपटातील एक देखणं पोस्टर नुकतंच  प्रदर्शित झालं  आहे.  

यात मालुसरे यांचं संपूर्ण कुटुंब पहायला मिळतंय. त्यात त्यांची आई, पत्नी, भाऊ, वहिनी, मुलगा आणि सदैव खंबीर साथ देणारे शेलारमामा दिसतायेत. यातील सुभेदारांची भूमिका अभिनेता अजय पूरकर तर त्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या पत्नीची सावित्रीबाईंची भूमिका अभिनेत्री स्मिता शेवाळे यांनी साकारली आहे.

सावलीप्रमाणे आपल्या थोरल्या भावाची पाठराखण करणाऱ्या सूर्याजी मालुसरेंच्या दमदार भूमिकेत अभिजीत श्वेतचंद्र, तर त्यांच्या पत्नीची म्हणजे यशोदाबाईंची भूमिका शिवानी रांगोळे हिने साकारली आहे तर मालुसरे कुटुंबीयांचा आधारवड असणाऱ्या शेलारमामांच्या भूमिकेत समीर धर्माधिकारी दिसतायेत. तान्हाजीरावांच्या आई म्हणजे पार्वतीबाईंच्या भूमिकेत उमा सरदेशमुख तर मुलगा रायबाच्या भूमिकेत अर्णव पेंढारकर आहे.      

ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे. प्रद्योत  पेंढारकर, अनिल वरखडे,  दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड हे ‘सुभेदार’ चित्रपटाचे निर्माते आहेत.

Web Title: Ajay purkar shivani rangole movie tanaji malusare new poster out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.