'सिंघम अगेन' सिनेमाच्या शूटिंगचा श्री गणेशा; रोहित शेट्टी आणि अजय देवगनची जोडी पुन्हा करणार धमाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 04:47 PM2023-09-17T16:47:46+5:302023-09-17T16:49:06+5:30
अजय व रोहित शेट्टी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करणार आहेत. होय, ही जोडी लवकरच सिंघम फ्रेंचाइजीचा तिसरा पार्ट घेऊन येतेय.
रोहित शेट्टी आगामी 'सिंघम अगेन' चित्रपटासाठी चर्चेत आहे. आता या चित्रपटाबाबत नवीन माहिती समोर आली आहे. या सिनेमाच्या शूटिंगचा श्री गणेशा झाला आहे. मुहूर्ताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
रोहित शेट्टीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली. रोहित शेट्टीने पोस्टमध्ये म्हटलं की, "सिंघम, सिंघम रिटर्न, सिम्बा, सूर्यवंशी...१२ वर्षांपूर्वी, आम्ही सिंघम बनवला होता. तेव्हा एक कॉप युनिव्हर्स निर्माण होईल, असे आम्हाला कधीच वाटले नव्हते. पण, आज, आम्ही सिंघम अगेनचे शुटिंग सुरू करत आहोत. कॉप फ्रँचायझीमधील हा 5 वा चित्रपट आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी आम्ही जिवापाड मेहनत करु. फक्त तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असू द्या". रोहित शेट्टीच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला.
रोहित शेट्टीने 'सिंघम अगेन'च्या मुहूर्तादरम्यानच्या फोटो शेअर केले आहेत. या रणवीर आणि अजय देवगन दिसत आहेत. रणवीर हा सिम्बा लूकमध्ये दिसतोय. तर अक्षय कुमार या पुजेला उपस्थित नव्हता. त्याने पोस्ट करत 'या फ्रेममध्ये मी शरीराने नाही पण मनाने मी तिथेच आहे, असे म्हटलं.
रोहित शेट्टीचा २०११ मध्ये 'सिंघम' प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला जोरदार प्रतिसाद मिळाल्यानंतर २०१४ साली 'सिंघम २' प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता १० वर्षांनी 'सिंघम ३' म्हणजेच 'सिंघम अगेन' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०२४ मध्ये रोहित शेट्टीचा हा सिनेमा प्रदर्शित होईल. त्याचबरोबर 'सिम्बा' आणि 'सूर्यवंशी' हे देखील रोहितच्या कॉप युनिव्हर्सचे चित्रपट आहेत. आता सिंघम अगेनमध्ये बाजीराव सिंघम, सिंबा व सूर्यवंशी अशी तीनही पात्र आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
शिवाय, 'सिंघम अगेन' या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची झलक दिसणार आहे. अजय देवगनच्या बहिणीच्या भूमिकेत ती दिसेल. तर करीना कपूरदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेता अर्जुन कपूर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.