अजिंक्य देव यांनी संपूर्ण करिअरमध्ये पहिल्यांदाच केले असे काम, वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान,जाणून घ्या नेमकं काय घडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 12:51 PM2021-07-12T12:51:09+5:302021-07-12T12:51:41+5:30
रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा शिवरायांनी रचला आणि या जाणत्या राजाच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नपूर्ततेसाठी हजारो शिलेदारांनी जीव ओवाळून टाकला. याच शिलेदारांच्या शौर्याची गोष्ट सांगणारी ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिका आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी उच्चारलं तरी उर अभिमानाने भरुन येतो. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा शिवरायांनी रचला आणि या जाणत्या राजाच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नपूर्ततेसाठी हजारो शिलेदारांनी जीव ओवाळून टाकला. याच शिलेदारांच्या शौर्याची गोष्ट सांगणारी ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिका २६ जुलैपासून सुरु होत आहे.
नेतोजी पालकर, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशिद, जीवा महाला, तान्हाजी मालुसरे, कान्होजी जेधे, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, मुरारबाजी देशपांडे, कोंढाजी फर्जंद या शूरवीरांची नावं आपल्याला परिचित आहेत. ‘जय भवानी जय शिवाजी’ ही मालिका या लवढय्यांच्या शौर्याला अर्पण असेल. अभिनेता भुषण प्रधान या मालिकेत छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार असून सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव बाजीप्रभू देशपांडेंच्या भुमिकेत दिसतील. तर अभिनेता कश्यप परुळेकर नेतोजी पालकरांची भूमिका साकारणार आहे.
छत्रपती शिवरायांचं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या शिलेदारांनी प्राणांची आहुती दिली त्या शिलेदारांच्या शौर्याला ही मालिका समर्पित आहे. ही भूमिका साकारताना कोणत्याही गोष्टीची कमी राहू नये यासाठी अजिंक्य देव खूप मेहनत घेत आहेत. ही ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्यांनी चक्क केसांना कात्री लावली आहे.
अभिनयाच्या आजवरच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच मी केसांना कात्री लावल्याचं अजिंक्य देव म्हणाले. एक अभिनेता म्हणून हा निर्णय घेणं माझ्यासाठी थोडं कठीण होतं. प्रेक्षकांना हा लूक आवडेल का याची भीती देखिल होती. मात्र माझ्या या नव्या लूकला प्रेक्षकांनी पसंती दिलेली पाहून माझा निर्णय योग्य असल्याचं समाधान आहे.
इतिहासावरच्या प्रेमापोटीच हे शक्य झालं आहे. बाजीप्रभू देशपांडेंसारखं भव्यदिव्य व्यक्तिमत्व साकारायचं तर एवढा त्याग करणं गरजेचं होतं असं मला वाटतं अशी भावना अभिनेते अजिंक्य देव यांनी व्यक्त केली.